Saturday, April 25, 2020

पृथ्वी, मास्क, वजीर आणि बरंच काही...






Photo Credit : Priyanka Ghogare


हा तुम्हाला ग्राफिक्स फोटो वाटतोय का ?

वाटत असेल तर मग तुम्ही चुकलात, हा आहे आपल्या मुलाला नवीन काहीतरी शिकविण्यासाठी आईने  बनविलेल्या सध्याच्या परिस्थितीचा घरगुती आर्ट. थोडक्यात, आपल्या भाषेत सांगायचं झालं तर, मम्मा, हे लॉकडाऊन का आणि कसं आहे ? हे चिमुकल्याला सांगायचा आईचा प्रयत्न.

तर काय आहे या फोटो मध्ये.. पृथ्वी दिसते, तिला लावलेला तो मास्क दिसतो  अजून खाली काहीतरी बुद्धिबळाच्या पटावरच्या सोंगट्या..

त्याचं काय झालं.. हे आर्ट बनविणारी आई म्हणजे नाशिकमधील ट्रेकर, फोटोग्राफर प्रियांका घोगरे. आई आपल्याला बाहेर का जाऊ देत नाही याचा जाम वैताग आलेल्या त्यांच्या मुलाने त्यांना अगदी वैतागून विचारलं.. (जसं सध्या आपण विचारतोय तसं...) किती दिवस बाहेर जायचं नाही खेळायला ? या प्रश्नावर आईनेही त्याच भाषेत उत्तर दिले.. लॉकडाऊन संपला की मग जा.. रोज रोज लॉकडाऊन हा शब्द ऐकून तो आता शांतपणे पण तेवढ्याच रागात बोलला,मम्मा, हे लॉकडाऊन का आणि कसं आहे ? हा अनपेक्षित प्रश्न ऐकून आईची धांदल तर उडालीच, की कसं सांगायचं याला याच्याच भाषेत आणि मग उपयोगात आल्या मुलाच्याच खेळण्या.

मुळात फोटोग्राफर हा आर्टिस्टच असतो. त्यामुळे सगळ्या कला बाहेर काढून मुलाच्या निरागस प्रश्नाला उत्तर द्यायला सुरुवात झाली.

पहिले घेतला पृथ्वीचा ग्लोब. हा ग्लोब म्हणजे, ही पृथ्वी आता आधीसारखी नाही राहिली, कोरोनामुळे सगळं बदलत चाललंय, अगदी खाली पसरविलेल्या विखुरलेल्या ब्लॉक्स सारखं.. मग घेतला बुद्धिबळाचा पट आणि सोंगट्या..
बुद्धिबळाचा पट.. हो, कारण तेच तर चाललंय जागतिक स्तरावर.. पृथ्वी, जीला आपण वसुंधरा म्हणतो, तिच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकलाय, तरी देखील देशा देशांमध्ये राजकारणच सुरु आहे. हाच पट म्हणजे एका राजकारणाचा केंद्रबिंदू झालाय..

याच्यावरील सोंगट्या म्हणजे आपल्या पृथ्वीवरील देश. यात काही स्वतःला जगज्जेते समजतात तर काही आपल्या आपल्या कामाशी काम ठेवून शांतपणे वाटचाल करतात; थोडक्यात सांगायचं झालंच तर, जेव्हा स्वतःला जगज्जेते, प्रगतीशील देश आपले सैन्यबळ वाढविण्यात एकमेकांशी स्पर्धा करत होते तेव्हा क्युबा सारखा देश मात्र आपल्या छोट्याशा देशात वैद्यकीय क्षेत्रात स्वतःला शांतपणे विकसित करत होता. आज महान असे देश या विषाणूचा सामना करताना घायाळ होत आहेत, तेव्हा त्यांना डॉक्टर पुरविण्याचे काम क्युबा करत आहे. तसेच सत्तरच्या दशकात जेव्हा व्हिएतनाम वर लाखोंच्या संख्येने बॉम्ब हल्ले करून अमेरिकेने उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता त्याच अमेरिकेला विषाणूपासून वाचण्यासाठी वरदान ठरलेल्या पीपीई किट्सचा पुरवठा आज व्हिएतनाम करतंय.

म्हणजे बघा, जे स्वतःला ह्या पटावरच्या सोंगट्यामधील वजीर समजायचे, हे समजण्याच्या नादात लोकांसाठी त्यांनी वास्तवात काहीच सुधारणा केल्या नाहीत, म्हणून ते गारद झाले आणि शांतपणे एक एक पाउल टाकणारे प्यादे आठ घरे पूर्ण करून, लोकांचा विचार करून त्यांच्या प्राथमिक बाबी समजून त्यावर काम करून आज वजीर झालेत. काळाचा महिमा दुसरं काय...

या पृथ्वीवर हा विषाणू पसरत चाललाय.. यातून लोकांनी वाचावे म्हणून गल्ली पासून ते देशांपर्यंत सगळं बंद करण्यात आले आहे. म्हणजे काय तर हा संसर्ग कोणाचा कोणाला होऊ नये.. म्हणून ती साखळी, कुलूप.. आणि तो मास्क दिसतोय का.. तो मास्क म्हणजे या लॉकडाऊनची किल्ली.. ती बघा मास्कच्या बाजूलाच लावलेली आहे.
सगळ्या पृथ्वीवर ते दोन थेंब दिसताय ना, ते थेंब म्हणजे आपले घरदार लांब ठेवून लोकांनी लॉकडाऊनचे पालन करावे म्हणून उन्हातान्हात उभे असणाऱ्या पोलीस, प्रशासन यंत्रणा यांच्या घामाचे प्रतिक आहे. घरच्यांना स्वतःपासून लांब ठेवायचे आणि आपल्याला काही होऊ नये म्हणून सतत काळजी घेत काम करायचे अशा सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी पोलीस यंत्रणा यांना तो सलाम आहे.

आणि अखेरीस उरतो तो हात.. तो प्रेरणादायी हात म्हणजे ना...  जो पूर्ण जगाला हळूहळू का होईना सॅनिटाईज करतोय, कुठे नव्वदीतली आजीबाई कोरोनाला हरवते तर कुठे कोरोनाशी लढणारी बाळंतीण बाई निरोगी मुलाला जन्म देते, हे सगळं त्या हातामुळे, तो हात आहे संकटाच्या सर्वात जवळ राहून काम करणाऱ्या डॉक्टरांचा.. दिवसभर पीपीई सूट घालून अन्न पाणी सेवन न करू शकणाऱ्या नर्स आणि वॉर्ड बॉयचा..

सलाम त्यांच्या कार्याला..

आर्ट पूर्ण झालं.. आईच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते पण त्यात थोडं हसू देखील होतं.. एक आर्ट पूर्ण केल्याचं.. लेकराला एक गहन विषय समजावून सांगण्याच समाधान त्या थोड्या हास्यात होतं.

लेकराचा मात्र निरागस भाव होता.. मम्मा, आता नाही मी बाहेर जाणार.. हे लॉक तोडण्यासाठी मास्कच्या किल्लीचा मी वापर करेल.. आणि हात स्वच्छ धुवेल नेहमी.. आणि मम्मा, मी घरातच थांबेल.


फोटो क्रेडीट : प्रियंका घोगरे (Priya ghogare photography)

शब्दांकन : वैभव सुरेश कातकाडे
०९५९५६९८७५९


गोदामाई आज खळाळली..



गोदामाई आज खळाळली..

गंगापूर धरणातून निघाली तशी मोकळ्या वाटेने गेली, आज कोणी अंगा खांद्यावर खेळायला का येत नाही. म्हणून विचारात पडली.. एवढी स्मशान शांतता कधी अनुभवलीच नाही म्हणून कावरी बावरी देखील झाली.
ती धरणातून निघालीये समजताच सोमेश्वर धबधब्यावर एव्हाना कॉलेजच्या तरुण तरुणींची गर्दी झालेली असायची; मक्याचे कणीस खात, कॅमेरामध्ये फोटो काढून ते आनंद घेत असायचे; मग ती हि त्यांना फेसाळणारी पोज देऊन मोहक करून टाकत असे, आज का कुणास ठाऊक एवढी निरव शांतता का पसरली. जाऊद्या म्हणत ती पुढे निघाली;

नवश्या गणपती उजव्या बाजूला सारत पुढे सरकली.. बोटी का अशा ओसाड पडल्या आहेत, माझा गणु आज गर्दीत का नाही ? म्हणून आश्चर्य करायला लागली.. याला तर गर्दीत राहून भाव खायची सवय आहे आणि आता असा का शांत झालाय म्हणून विचारात पडली..

मनात विचार करत पुढे निघाली, सावरकरनगरच्या बापू पुलावर टोणगे मजा करत असतील; बड्या बापाचे पोरं गाड्या उडवत असतील असा विचार मनात आणून कुत्सित हास्य आणून पुढे निघाली, बापू पूल जवळ आल्यावर भयानक शांतता तिला जाणवली, अरेच्या आज इथे कोणीच नाही.. गेल्या वर्षी माझ्या रौद्र रूपाने इथलं उध्वस्त झालेलं आता पुन्हा कसं राहिलंय हे बघत बघत पुढे सरकली..


Photo Credit : Keshav Mate



केटीएचएम कॉलेजच्या बोटक्लब वर कोणीतरी नक्की असेल; रोइंग करणारे किंवा परीक्षा असल्याने पेपरच्या आधी रिव्हिजन करणारे तर नक्कीच असतील असा भाबडा विश्वास घेऊन निघाली, पण तिला काय माहित लॉकडाऊनमुळे सारं कॉलेज शांत झालंय, मुलांना परीक्षा न घेताच पुढच्या वर्गात पाठवलंय..

आता मात्र हिरमुसली, आणि चीड चीड करायला लागली, तोवर सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर लागले.. लगबगीने पुजारी तांब्याची कळशी घेऊन पाण्यात येताना दिसला आणि तिला थोडं हायसं वाटलं, माझ्या नाशिकमध्ये कोणीतरी आहे हि भावना तिला समाधान करून गेली, पुजाऱ्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या त्याने कळशी भरली आणि सिद्धेश्वरला तिचा अभिषेक केला.. आणि महादेवाकडे मागणं मागितलं, जगाला वाचीव असं काहीतरी पुटपुटला..

तिला आता थोडी भीती जाणवायला लागली, नक्की काहीतरी विपरीत घडत असल्याचं जाणवायला लागलं.. व्हिक्टोरिया छे छे... अहिल्याबाई होळकर पुलाजवळ आली.. पुलाकडे बघितले तर एकही माणूस तिला बघायला नाही.. एक भीतीयुक्त शांतता अनुभवली..

शहरात कोणीही कुठेही असो किंवा नसो पण रामकुंडावर मात्र कोणी न कोणी असतेच.. असा विचार करून निघाली.. गांधी तलाव शांत निद्रेत होता.. गांधी ज्योत तर ओसाड पडली होती. दशक्रियेचा घुमट निपचित कोपऱ्यात पडल्यासारखा भासत होता..

Photo Credit : Yatish Bhanu

पोहचलीच ती रामकुंडावर.. एवढ्या उन्हात रामकुंडावर तिच्यावर उड्या मारणारे आज कोणीच नाही..आता मात्र तिथली कधीही न अनुभवलेली शांतता, रामकुंडाचा तो एकाकीपणा बघून तिचा बांध फुटायला लागला होता.. बाणेश्वर महादेव, साई बाबा मंदिर सर्व बंद.. कपालेश्वर महादेव तर... असा विचार येऊन ती आवाज देऊ लागली, कपालेश्वर महादेवा, आहेस कुठे रे बाबा? याच साठी जटा आपटून तुम्ही मला ब्रम्हगिरीच्या कुशीतून आणले होते ? अहो, ज्यांच्यासाठी तूम्ही मला आणलं ते आहेत तरी कोठे ?... गेल्यासाली तुमच्याजवळ पार वरती आली होती मी.. आठच पायऱ्या बाकी असताना तुम्हीच बोलले होते ना अजून वरती नको येऊ; माझं शहर पाण्यात जाईल...मीच येतो भेटायला.. मग आता कुठे आहेत ते शहरातले लोकं.. कि येऊ मी वरती म्हणजे माझ्या लेकरांना मला भेटता येईल..शहरभर फिरता येईल..

कपालेश्वर भोलेनाथ अगदी शांत मुद्रेत स्मित हास्य करत आशीर्वादाचा हात दाखवत होते.  

ते संयमी रूप बघून आता मात्र ती चिडली, राग कोणावर काढणार तर समोर दुतोंड्या मारुती दिसला.. आणि तिचा सगळा रागाचा बांध तिथेच फुटला..

Photo Credit : Navin Kamod

 
लेकरं कुठे रे माझी ? तुला सांभाळायला काय झालं ? ते येत का नाही अजून मला भेटायला ? तुला विचारतीये रे मी.. अरे, तुच साक्षीदार होता न प्रभूरामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या सान्निध्यापासून ते आजपर्यंत मला माझ्या पिल्लांपासून कोणी लांब केलेले नाहीये.  तूच साक्षीदार आहेस, लाखोंचा कुंभमेळा मी माझ्या अंगावर कित्येक वर्षांपासून खेळवते.. तूच साक्षीदार आहेस.. मग आज कुठे गेले सगळे ? असा रागात प्रश्नांचा भडिमार करत होती.

दुतोंड्या मारुती मग शांतपणे बोलला, माऊली जगात विषाणूने कहर केलाय म्हणून कोणी घराबाहेर नाही. सगळे व्यवहार ठप्प झालेत, घाटावर भरणारा बाजार तुला काही नवीन नव्हता पण आता तो हि नाही.. माझ्या प्रभूचा रथ सुद्धा यावेळी निघाला नाही.. माझ्या प्रभूचा जन्मदिन पण शांततेतच गेला.. असं सांगताच डोळ्यात आसवे जमा झाली.. ती पुसून पुढे म्हणाला, माऊली हे संकट सगळीकडेच आलंय.. लोकांनी स्वतःच्या संरक्षणासाठी घरीच थांबणे योग्य आहे.. थोडा आवर घाल स्वतःला.. बरं झालं तू आलीयेस.. आता तूच मार्ग काढ यातून.


भावनिक साद ऐकून गोदाई पण शांत झाली एखाद्या संन्याशासारखी.. काय बोलू आता अशी अवस्था झाली तिची, मग धीर करून बोललीच.. हनुमंता, किती सुंदर वातावरण असायचे रे पूर्वी.. दुतर्फा झाडे, प्राणी पक्षी तर आरामात गुण्यागोविंदाने खेळायचे, बागडायचे.. हळू हळू विकास झाला..सिमेंटच शहर झालं.. मला हि याच माझ्या लेकरांनी बंधनात अडकवलं.. राग तो नाहीये रे मनात.. आणि माऊली कधी राग धरते का.. आता ही वेळ माझ्या लेकरांवर आलीये.. मला बघवत नाहीये पण त्यांना जाणीव तर होऊ दे.. या निसर्गाने किती उपकार करून ठेवले आहेत. थोडे दिवस सोसूदेच त्यांना असं म्हणत तिने डोळे पुसले.. नाटकी हसू आणलं चेहऱ्यावर आणि दुतोंद्याला म्हणली.. सर्व काही सुरळीत होईल, तू मात्र काळजी घे..
यावर्षीही तुला 3 4 वेळा मस्तकाभिषेक करणार आहे मी...

दुतोंड्या मारुतीला समजले, डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू आणत त्यानेही गोदा माऊलीला निरोप दिला..
अशा रीतीने आज गोदामाई खळाळली.. आज गोदामाई खळाळली.. 
- वैभव सुरेश कातकाडे, नाशिक
09595698759

Sunday, April 19, 2020

नारोशंकर घंटा : गोदावरीच्या महापुराचे मापक




तब्बल पन्नास वर्षांनंतर गोदाकाठची ऐतिहासिक नारोशंकराची घंटा गोदावरीला आलेल्या पुरामुळे बुड़ाली. त्यानिमित्ताने जाणून घेऊ या ऐतिहासिक नारोशंकर घंटा आणि मंदिराबद्दल...


पेशव्यांच्या काळात नाशिकचे सरदार नारोशंकर राजेबहाद्दर यांनी 1747 मध्ये रामेश्वर मंदिर बांधले, दोन प्रवेशद्वार असलेल्या या मंदिराचे बांधकाम करण्यासाठी त्यांना तब्बल 18 लाख रुपये खर्च आला. मंदिर उभारण्यासाठी राजस्थान आणि गुजरात येथुन कारागीर बोलावले असल्याचे जाणकार सांगतात. हे मंदिर फक्त हेमाडपंथी नसून नागरी पारंपारिक स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे. या मंदिराचे सभामंडप हेमाडपंथी तर मंदिराभोतती असलेल्या छत्रा राजपूत शैलीच्या आहेत, असे हे भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या शैलीचा वैविध्यपूर्ण नमूना म्हणजे नारोशंकर मंदिर असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मंदिराच्या सभोवतालच्या भिंतीवर अक्षय नागाचे कोरीवकाम करण्यात आलेले असून याचे महत्व म्हणजे हा नाग शिव शंकराचे काळावर असलेले नियंत्रण दर्शवतो. या मंदिरातील शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय सरदार नारोशंकर राजेबहाद्दर दैनंदिन काम करत नसत. मंदिराच्या सभोवताली है मंदिर गोदाकाठी असल्याने घाटांपासून मंदिराची शांतता अबाधित राहावी आणि पुरापासून मंदिराचे संरक्षण व्हावे या हेतूने मंदिराच्या सभोवताली एक भक्कम दगडी भिंत उभारली आहे. मंदिराच्या चारही बाजूने राजपूत शैलीने तयार करण्यात आलेल्या छत्र्या आणि मध्यभागी असलेले नारोशंकराच्या मंदिराचा कळस लांबूनच लक्ष वेधुन घेतो.



श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांविरुद्ध वसईच्या लढाई मध्ये मराठ्यांनी अभूतपुर्व पराक्रम केला. त्यावेळी वसईच्या लढाईचे स्मरण राहावे म्हणून किल्ल्यामधील चर्चच्या काही घंटा पेशवे 1739- 40 मध्ये सोबत घेऊन आले. त्यातील एक घंटा नाशिकमधील रामेश्वर मंदिरात ठेवण्याचे ठरवले. ही घंटा सध्या दिसते तिथे म्हणजेच मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वारावरती बांधण्यात आली. आजही ही घंटा मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून दिमाखात उभी आहे. या घंटेच्या बाजूला असलेला महीरप हा देखील राजपूत शैलीचा आहे. तेव्हापासून या रामेश्वर मंदिशाला नारोशंकर मंदिर आणि घंटेला नारोशंकर मंदिराची घंटा असे म्हणतात.

यापूर्वी 1969 मध्ये महापूर आला होता तेव्हा पुराच्या पाण्याच्या लाटांनी ही घंटा बाजली होती आणि तिचा आवाज 5 ते 6 किलोमीटर घुमला होता, असे सांगितले जाते. गोदावरी नदीच्या बाजूने बघितल्यास घंटेच्या आजूबाजूला दोन घुमटाकार छत्र्या आणि घंटेच्या मागे  नारोशंकराच्या मंदिराचे सलग तीन कळस दिसतात.


(संदर्भ : जाणकारांची माहिती, नाशिक माहिती पुस्तक)

वैभव सुरेश कातकाडे, नाशिक   

Thursday, February 27, 2020

ज्ञानोबांनी दिला मायबोलीचा वसा || विश्वात प्रयत्नांनी उमटवू तिचा ठसा ||



भल्या सकाळी दूरचित्रवाणीवर एक सुंदर कार्यक्रम सुरू होता. ज्ञानेश्वरीमधील काही ओव्या आणि त्यांचे विवेचन असं काहीसं त्या कार्यक्रमाचं स्वरूप. अर्थात कारणही तसंच होतं, आषाढी एकादशीचा तो दिवस होता. विवेचनासोबतच मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठोबारायाची पूजा आणि विठोबामाउलीकडे मुख्यमंत्र्यांनी मागणे मागितले आणि पुन्हा ते विवेचन. पण, ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीला या दिवशी एवढे महत्त्व का ? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. मराठी भाषेतील एक प्रमाणग्रंथ असलेली ज्ञानेश्वरी. पण याच ज्ञानेश्वरीबद्दल एक शोकांतिका आहे; आजच्या पिढीतील मराठी म्हणवणाऱ्या किती लोकांना हा ग्रंथ माहिती आहे ? आणि माहिती जरी असला तरी किती लोक आहेत कि ते समजून घेऊन ती अंगिकारतात. ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे.

अंदाजे सोळाशे वर्षांचा इतिहास असलेली भाषा सातवाहन काळात महाराष्ट्र प्राकृत म्हणजे तेव्हाची मराठी राजभाषा गौरवलेली आहे. पंढरीच्या वाळवंटात वारकऱ्यांच्या मांदियाळीतील अठरापगड जातीच्या संतांनी भागवत धर्माचा पताका त्यासोबत भाषेचा प्रसार व्हावा म्हणून प्रमाणबद्ध केलेली अभंगरचना या साहित्याचा मनमुराद आनंद देऊन जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील भाषा राज्यव्यवहारकोशात आढळते. शिवोत्तर कालखंडात मराठी साम्राज्याचा प्रसा देशाच्या कानाकोपऱ्यात झाल्याने माय मराठी देशाच्या कानाकोपऱ्यात निनादू लागली. कालांतराने झालेल्या सत्तास्पर्धेत ब्रिटिशांनी मराठ्यांची सत्ता गिळंकृत केली, त्यामुळे मराठी भाषेला नवा राज्यकर्त्यांच्या इंग्रजी भाषा सामोरे जावे लागले. या संक्रमण काळात मराठी भाषेचे संरक्षण करण्याचे काम तत्कालीन समाजसुधारकांनी केले. स्वातंत्र्योत्तर काळात भाषिक प्रांतरचना आग्रह धरताना मराठी भाषिकांचा वेगळा प्रदेश असावा या मागणी साठी सर्व मराठी जनता एकत्र आली.

 

भाषा ही सर्व प्रकारच्या शिक्षणाचे खऱ्या अर्थाने मुळ असते. भाषेला रंग रूप देण्याचे कार्य त्या भाषेतील सहजता, कवणे, अलंकार, म्हणी इत्यादी गोष्टी करतात. त्यांच्या विविधांगी गुणांमुळे भाषा किती समृद्ध आहे, याची प्रचिती येते. सध्या महाविद्यालयीन मराठी मंडळींनी हिंदी त्याचसोबत इंग्रजी मिश्रित बोलीभाषा करून अवघ्या मराठी चे वातावरण प्रदूषित केले आहे. ज्या भाषेने आपल्याला मोठे केले, त्याच मराठी भाषेचा वीट येऊन आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करून इंग्रजी शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य करावे यासाठी केविलवाणी आर्जवे आजचे पालक करताना दिसत आहे.  

जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी जरूर शिकावे यात दुमत नाही, पण आपली मातृभाषेचा विसर पडता कामा नये. गणित, विज्ञान, अर्थशास्त्र यांसारख्या अवघड विषयांच्या किचकट संकल्पना भाषेत फार पटकन समजतात कारण आपल्याच पूर्वजांनी लिहून ठेवलेले साहित्य. असा कोणताच विषय नाही कि ज्याचे संदर्भ मराठी भाषेत सापडणार नाही.

साधारण दहा-बारा वर्षांपूर्वी केंद्र सरकारने तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. तदनंतर संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया इत्यादी भाषांचा क्रमांक लागला. आपली मायबोली जगात दहाव्या क्रमांकाची भाषा मानली जाते. मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या रंगनाथ पठारे समितीने पाच-सहा वर्षांपूर्वी सखोल संशोधन करून सुमारे पाचशे पृष्ठांचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला. हा दर्जा तात्काळ द्यावा, अशी शिफारस साहित्य अकादमीच्या भाषातज्ञ यांनी सरकारला केली, त्याला आता तीन वर्षे पूर्ण होत आहेत. सरकार दरबारी लालफितीत अडकण्याचा अनुभव हि भाषा घेत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कुठलीच भाषा लोप पावत नाही जोपर्यंत तिचे साहित्य, त्या साहित्याचा अभ्यास करणारे साधक जिवंत आहे.

 

आपल्या मराठी बद्दल बोलायचे झाल्यास ज्ञानोबा माऊलींनी लिहून ठेवलेली ज्ञानेश्वरी ही इंग्रजी कवी मिल्टन याचे पॅराडाईज लॉस्ट आणि इटालियन कवी दान्ते याचे ‘डीव्हाईन कमोडिया’ यांआधी कितीतरी वर्षे लिहिलेली होती.  यावरून आपल्याला आपल्या भाषेच्या साहित्याची उंची समजेल.

ज्ञानेश्वरीसारख्या आपल्या साहित्यावर संशोधन करण्यासाठी परदेशातून नागरिक येथे येतात. ते हि भाषा शिकतात, आपलीसी करतात आणि शोधनिबंध तयार करून आपल्या माय मराठीला कृतार्थतेचा सलाम ठोकत आपले जीवन समृद्ध करून घेतात; कारण त्यांना आपल्या साहित्याच्या उंचीची ओळख झालेली असते.  त्यामुळे नकळत असे वाटते की, आपल्या साहित्याची उंची एवढी आहे की आपण तिथे पोचायला कमी पडतो.

वी यशवंत यांनी एका ठिकाणी आशावाद व्यक्त करताना म्हटले की, मराठी ही वैभवशाली राजभाषा म्हणून ओळखली जाईल. ज्याप्रमाणे स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात समाजसुधारकांनी मराठी भाषेचा प्रसार केला होता त्याच प्रमाणात आताच्या युवा वर्गाची ही जबाबदारी असेल की, त्यांनी मराठी भाषेला ते वैभव प्राप्त करून द्यायला हवे. शेवटी एकच म्हणावेसे वाटते..

ज्ञानोबांनी  दिला मायबोलीचा वसा ||
विश्वात प्रयत्नांनी उमटवू तिचा ठसा ||

Wednesday, January 15, 2020

तान्हाजी : द अनसंग वॉरियर



आजच्या युगात इतिहासाचे कथानक वापरून अनेक चित्रपट बॉलीवूड मध्ये येत आहेत. एखाद्या गोष्टीचा इतिहास माहित असणे आणि तो इतिहास भव्यदिव्य दाखवणे यात जो फरक आहे तो ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ यात नीटनेटका मांडला आहे. शेवटी इतिहास तो इतिहासच असतो, मग त्याला भरजरी शालू नेसवून समोर आणा किंवा शाल श्रीफळ देऊन आणा त्यात काही बदल होत नाही. पण आजच्या काळात या आणि अश्या घटनांवर चित्रपट काढायचे म्हणजे मोठे दिव्यच म्हणावे लागेल. कारण त्या घटनेची असलेली नोंद, त्याबद्दलचे दाखले, त्याबद्दल कोणी लिखाण केले असेल तर लिखाण करत असताना लेखकाने वापरलेले संदर्भ यांचा धांडोळा घेऊन कथानक बनवावे लागते म्हणजेच वास्तवाला धक्का न लावता अभ्यास, संशोधन आणि तर्क या त्रिकुटाच्या संयोगाने घटनेची मांडणी करून कथानक बनविणे हे दिग्दर्शक पर्यायाने लेखकासमोर मोठे आव्हान असते.

तान्हाजी : द अनसंग वॉरियर हा चित्रपट मात्र कथानकाची गरज म्हणून थोडा बदल गृहीत धरूनच बघावा लागतो त्यामुळे चित्रपट आणि त्याचे कथानक प्रेक्षकांना एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. ओम राउत या नवख्या दिग्दर्शकाने आपल्या पहिल्याच हिंदी चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा अगदीच भव्यदिव्य अशा थाटात मांडली आहे. 


लहानपणापासूनच मराठी मनावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असलेल्या स्वराज्यकथांचे गरुड असतेच. ओम राउत या दिग्दर्शकाने हिंदी चित्रपटाच्या पदार्पणातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एका ऐतिहासिक घटनेचा चित्रपट बनवला सोबतच बॉलीवूड मधील ख्यातनाम कलावंतांचा खुबीने वापर करून चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवळे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र यामध्ये ओम राउत याने इतिहासापेक्षा कोणीच मोठे होणार नाही याची देखील काळजी घेतली आहे.

अजय देवगण निर्मिती मध्ये व्हीएफएक्सचा वापर करत त्याला थ्री डी तंत्रज्ञानाची जोड दिलेली असलेला तान्हाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या उजवाच ठरतो. 

चित्रपटाची सुरुवात जरी संयत झालेली असली तरी देखील चित्रपट पुढे कधी सरकतो आणि चित्रपटाचा मध्यान्ह कधी येतो ते समजत नाही. नावाप्रमाणे हा चित्रपट तान्हाजी वर असला तरी प्रेक्षकांना उदयभान राठोड नक्की कोण? आलमगीर बादशहाच्या चाकरीत साधा सैनिक असलेला उदयभान नक्की एवढा मोठा कसा होतो कि बादशहा त्याला दख्खन ची जबाबदारी देतो? असे काहीतरी वेगळे देण्याचा घाट दिग्दर्शकाने घातला आणि त्यात तो यशस्वी देखील होतो. 

स्वराज्यावर जेव्हा संकट आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत 23 किल्ले आणि इतर काही गोष्टींचा तह केला. त्यात कोंढाणा हा भरभक्कम किल्ला आलमगीर बादशहाच्या सेवेत गेला. तीन चार वर्षांनी दख्खनची राजधानी करायची म्हणून आलमगीर बादशाह आपल्या विश्वासू सेवकाला म्हणजेच उदयभान राठोड ला किल्लेदार म्हणून पाठवतो. हि खबर महाराजांना लागताच महाराज किल्ले कोंढाणा हि मोहीम हाती घेता पण मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलेला तान्हाजी हि जबाबदारी आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग रायबाचे असे म्हणत स्वतः अंगावर घेतो आणि मग सुरु होतो प्रवास कोंढाण्यावर भगवा फडकण्याचा..



अजय देवगण याने केलेली तान्हाजी ची भूमिका शंभर टक्के न्याय देऊन जाते तर काजोल ने निभावलेली तान्हाजीची बायको या सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत असलेल्या आणि महाराजांचा अभिमान असलेल्या एका सुनेची भूमिका भाव खाऊन जाते.  लहानग्या शिवाजी सोबत रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेणारा तान्ह्या तसेच संकट आल्यावर उजवा हाताने संकट बाजूला करायचे असते, त्यांच्यासमोर मान नसते असे म्हणत जीवाची बाजी लावण्यास तयार असलेला मित्र या आणि अश्या अनेक गोष्टींमधून शिवाजी महाराज आणि तान्हाजी यांची मैत्री समोर आलेली दिसते.

महाराजांच्या भूमिकेत असलेला शरद केळकर, सुर्याजीच्या भूमिकेत असलेला देवदत्त नागे यांनी आपापल्या भूमिकेला न्याय देत चित्रपटाची शोभा वाढविलेली दिसते. याध्येच ज्याचा उल्लेख तान्हाजी पेक्षा काकणभर का होईना उजवा अभिनय केलेला सैफ अली खान उदयभान राठोड याचा करावा लागेल. विक्षिप्त, जिद्दी आणि जिंकण्यासाठी कोणताही स्तर गाठणारा असा उदयभान सैफ ने जिवंत केलेला दिसून येतो. 

महाराजांचा इतिहास आपल्याला आपला वाटण्यासाठी आणि तो तितकाच प्रभावी आणि सरळ वाटण्यासाठी त्यासोबतच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत प्रेक्षकांसमोर आणण्याचे यशस्वी शिवधनुष्य दिग्दर्शक ओम राउत यांनी पेललेले आहे. 

वैभव सुरेश कातकाडे
नाशिक
 ९५९५६९८७५९ / ७०२००१६३९६

पृथ्वी, मास्क, वजीर आणि बरंच काही...

Photo Credit : Priyanka Ghogare हा तुम्हाला ग्राफिक्स फोटो वाटतोय का ? वाटत असेल तर मग तुम्ही चुकलात, हा आहे आप...