भल्या सकाळी दूरचित्रवाणीवर
एक सुंदर कार्यक्रम सुरू होता.
ज्ञानेश्वरीमधील काही ओव्या आणि त्यांचे विवेचन असं काहीसं त्या कार्यक्रमाचं स्वरूप. अर्थात
कारणही तसंच होतं, आषाढी एकादशीचा तो दिवस होता. विवेचनासोबतच मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठोबारायाची पूजा
आणि विठोबामाउलीकडे मुख्यमंत्र्यांनी मागणे मागितले आणि
पुन्हा ते विवेचन. पण, ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीला
या दिवशी एवढे महत्त्व का ? असा प्रश्न
पडणे साहजिकच आहे. मराठी भाषेतील एक
प्रमाणग्रंथ असलेली ज्ञानेश्वरी. पण याच ज्ञानेश्वरीबद्दल एक
शोकांतिका आहे; आजच्या पिढीतील मराठी
म्हणवणाऱ्या किती लोकांना हा ग्रंथ माहिती आहे ? आणि माहिती जरी असला तरी किती लोक आहेत कि ते समजून घेऊन ती
अंगिकारतात. ही विचार करायला लावणारी गोष्ट
आहे.
अंदाजे सोळाशे वर्षांचा इतिहास असलेली भाषा सातवाहन काळात महाराष्ट्र प्राकृत
म्हणजे तेव्हाची मराठी राजभाषा गौरवलेली आहे. पंढरीच्या वाळवंटात
वारकऱ्यांच्या मांदियाळीतील अठरापगड जातीच्या
संतांनी भागवत धर्माचा पताका त्यासोबत भाषेचा प्रसार व्हावा म्हणून प्रमाणबद्ध केलेली
अभंगरचना या साहित्याचा मनमुराद आनंद देऊन जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील
भाषा राज्यव्यवहारकोशात आढळते. शिवोत्तर कालखंडात मराठी साम्राज्याचा प्रसार देशाच्या कानाकोपऱ्यात झाल्याने माय मराठी
देशाच्या कानाकोपऱ्यात निनादू लागली. कालांतराने झालेल्या सत्तास्पर्धेत ब्रिटिशांनी मराठ्यांची
सत्ता गिळंकृत केली, त्यामुळे मराठी भाषेला नवा राज्यकर्त्यांच्या इंग्रजी भाषा सामोरे जावे लागले. या संक्रमण काळात मराठी
भाषेचे संरक्षण करण्याचे काम तत्कालीन समाजसुधारकांनी केले. स्वातंत्र्योत्तर काळात भाषिक प्रांतरचना
आग्रह धरताना मराठी भाषिकांचा वेगळा प्रदेश असावा या मागणी साठी सर्व मराठी जनता एकत्र आली.
भाषा ही सर्व प्रकारच्या
शिक्षणाचे खऱ्या अर्थाने मुळ असते. भाषेला रंग रूप देण्याचे कार्य त्या भाषेतील सहजता, कवणे, अलंकार, म्हणी इत्यादी गोष्टी करतात. त्यांच्या विविधांगी गुणांमुळे भाषा किती
समृद्ध आहे, याची प्रचिती येते. सध्या महाविद्यालयीन मराठी मंडळींनी हिंदी
त्याचसोबत इंग्रजी मिश्रित बोलीभाषा करून
अवघ्या मराठी चे वातावरण प्रदूषित केले आहे. ज्या भाषेने आपल्याला मोठे केले, त्याच मराठी भाषेचा वीट येऊन आपल्या पाल्यांना इंग्रजी
माध्यमाच्या शाळेत दाखल करून इंग्रजी शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य करावे यासाठी केविलवाणी आर्जवे आजचे पालक करताना दिसत आहे.
जागतिकीकरणाच्या युगात
इंग्रजी जरूर शिकावे यात दुमत नाही, पण आपली मातृभाषेचा विसर पडता कामा नये. गणित, विज्ञान, अर्थशास्त्र यांसारख्या अवघड विषयांच्या किचकट संकल्पना भाषेत फार पटकन
समजतात कारण आपल्याच पूर्वजांनी लिहून ठेवलेले
साहित्य. असा कोणताच विषय नाही कि ज्याचे संदर्भ मराठी
भाषेत सापडणार नाही.
साधारण दहा-बारा
वर्षांपूर्वी केंद्र सरकारने तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. तदनंतर संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया इत्यादी भाषांचा क्रमांक लागला. आपली मायबोली जगात दहाव्या
क्रमांकाची भाषा मानली जाते. मराठी भाषेला हा अभिजात
भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र
सरकारने नियुक्त केलेल्या रंगनाथ पठारे समितीने पाच-सहा वर्षांपूर्वी सखोल संशोधन
करून सुमारे पाचशे पृष्ठांचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला. हा दर्जा तात्काळ द्यावा, अशी शिफारस साहित्य
अकादमीच्या भाषातज्ञ यांनी सरकारला केली, त्याला आता तीन वर्षे पूर्ण होत आहेत. सरकार दरबारी लालफितीत अडकण्याचा अनुभव हि भाषा घेत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू
नये. कुठलीच भाषा लोप पावत नाही जोपर्यंत तिचे साहित्य, त्या साहित्याचा अभ्यास करणारे साधक जिवंत आहे.
आपल्या मराठी बद्दल बोलायचे
झाल्यास ज्ञानोबा माऊलींनी लिहून ठेवलेली ‘ज्ञानेश्वरी’ ही इंग्रजी कवी मिल्टन याचे पॅराडाईज लॉस्ट आणि इटालियन कवी दान्ते याचे ‘डीव्हाईन कमोडिया’ यांआधी कितीतरी वर्षे लिहिलेली होती. यावरून आपल्याला
आपल्या भाषेच्या साहित्याची उंची समजेल.
ज्ञानेश्वरीसारख्या आपल्या साहित्यावर संशोधन
करण्यासाठी परदेशातून नागरिक येथे येतात. ते हि
भाषा शिकतात, आपलीसी
करतात आणि शोधनिबंध तयार करून आपल्या माय
मराठीला कृतार्थतेचा सलाम ठोकत आपले जीवन समृद्ध करून घेतात; कारण त्यांना आपल्या साहित्याच्या उंचीची ओळख झालेली असते. त्यामुळे नकळत असे
वाटते की, आपल्या साहित्याची उंची एवढी आहे की आपणच तिथे पोचायला कमी पडतो.
कवी यशवंत यांनी एका ठिकाणी आशावाद व्यक्त करताना म्हटले की, मराठी ही वैभवशाली राजभाषा
म्हणून ओळखली जाईल. ज्याप्रमाणे
स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात समाजसुधारकांनी मराठी भाषेचा प्रसार केला होता त्याच
प्रमाणात आताच्या युवा वर्गाची ही जबाबदारी असेल की, त्यांनी मराठी भाषेला ते वैभव प्राप्त करून द्यायला हवे. शेवटी एकच
म्हणावेसे वाटते..
ज्ञानोबांनी दिला मायबोलीचा वसा
||
विश्वात
प्रयत्नांनी उमटवू तिचा ठसा ||
No comments:
Post a Comment