Thursday, December 22, 2016

स्वरभास्कर संगीत महोत्सवाचे वेगळेपण...

संस्कृती जपण्यासाठी भाषा जेवढी महत्वाची तेवढीच कला देखील महत्वाची आहे.कलेमध्ये संगीत क्षेत्र प्राधान्याने घ्यावे लागेल. देशात संगीत पुरातन काळापासून चालत आल्याच्या खाणाखुणा अजुनही दिसून येतात. राजदरबारी असलेले गायक कवी म्हणजे त्या राज्याचे प्रमुख अलंकार..कालांतराने राजेशाही निघुन गेली पण संगीत अजरामर असल्याने गुरु-शिष्य परंपरेतून घराणेशाही तयार झाली. यामध्येही प्रामुख्याने जयपुर घराणे, किराणा घराणे,ग्वालहेर घराणे, आग्रा घराणे इत्यादी.
प्रत्येक घरण्याचा बाज वेगळा, राग वेगळा, रियाजासाठी असलेला ठेका वेगळा त्यामुळे प्रत्येक घराण्याची एक विशिष्ट ओळख केलेली दिसून येते. यांतील एक महत्वपूर्ण घराणे म्हणजे किराणा घराणे...

खांसाहेब अब्दुल करीम खां यांना त्यांचे वडील कालेखां, चुलते अब्दुल्ल खां आणि चुलत चुलते हैदरबक्ष यांच्याकडून शिक्षण मिळाले. खांसाहेब अब्दुल करीमखां यांचे शिष्य म्हणजे रामभाऊ कुंडगोळकर उर्फ सवाई गंधर्व. सुरेश बाबू माने, रोशन आरा बेगम, गानहिरा हिराबाई बडोदेकर आणि सरस्वती राणे या किराणा घराण्याच्याच गायिका.पं.भिमसेन जोशी व गंगूबाई हनगल हे सवाई यांचे शिष्य होते.प्रभा अत्रे या देखील किरण घराण्याच्या प्रसिद्ध गायिका.

या घराण्याचे वैशिष्ट्य म्हणजे सुरेलपणा. या घराण्याचे तंबोरे इतके सुरेल लावलेले असतात की नुसते तंबोरे वाजू लागले की मैफलीत रंग भरायला सुरवात होते. अत्यंत भावपूर्ण गायन हे या घराण्याचे आणखी एक वैशिष्ट्य. तोडी,
 जोगिया, मालकंस, शुद्ध कल्याण, हे या घराण्याचे आवडते राग. हळुवारपणा, नाजुकपणा हा या घराण्याचा विशेष पैलू आहे. 

सन १९५२ मध्ये पं.भिमसेन जोशी यांनी आपल्या गुरुंच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'सवाई गंधर्व संगीत महोत्सव' सुरु केला. या मध्ये त्यांना मोलाची मदत गुरुबंधु पंडित फिरोज दस्तूर आणि गुरुभगिनी गंगुबाई हनगल यांची मिळाली. तेव्हापासून या महोत्सव नवकलाकारांना आकर्षित करत आहे. गायन वादन आणि नृत्याचा त्रिवेणी संगम असलेला हा महोत्सव देशभरातील विविध संगीत घरण्यांना बहुमान मिळवून देणारा ठरतो. या महोत्सवाच्या यशाचे गमक म्हणजे कोणत्याही कलाकाराला सवाई च्या मंचावरुन आपली कला सादर करायला जीवनाची, साधनेची सार्थकता वाटत असते.
 
सवाई महोत्सवाची प्रतिकृती म्हणून समजल्या जाणाऱ्या स्वरभास्कर संगीत महोत्सवाची प्रतिष्ठा देखील मोठी आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या कार्याला आदरांजली म्हणून पुण्यातील सुरश्री फाउंडेशन सन २०११ पासून या महोत्सवाचे आयोजन करत आहे.

या महोत्सवाची मुहूर्तमेढ २०११ मध्ये उद्धव ठाकरे यांसह अनेक मान्यवरांनी रोवली.
आतापर्यंत या महोत्सवात जयतीर्थ मेऊंडी,
 गौरी पाठारे, राकेश चौरसीया आदी मान्यवरांना स्वरभास्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. सालाबादप्रमाणे या ही वर्षी हा कार्यक्रम पुण्यात २३ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.

यावर्षीचा स्वरभास्कर पुरस्कार डॉ. रेवा नातू यांना प्रदान करण्यात येणार आहे. मुळच्या पुण्यातील असलेल्या रेवा नातू शास्त्रीय गायिका आहेत. वडील पं. विनायक फाटक प्रसिद्ध तबलावादक असल्याने त्यांचे संगीत शिक्षण घरातूनच झाले. कै. पं. शरद गोखले आणि डॉ. दिग्विजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे संगीत शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी एसएनडीटी महाविद्यालया मधून संगीत या विषयात प्रथम क्रमांक मिळविला. अखिल भारतीय गांधर्व विद्यालय, पुणे मार्फ़त त्यांनी संगीताचार्य ही पदवी मिळविली. यामध्ये सर्वाधिक गुण मिळवत  टी. डी. जानोरकर पुरस्कार आणि ललकारी यांसारख्या नऊ पुरस्कारावर मोहोर उमटविली. 
सध्या अखिल भारतीय रेडियो साठी असलेल्या एका पनेल वर संगीत कलाकार म्हणून कार्यरत आहेत. सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवमध्येही त्यांची कामगिरी उल्लेखनीय अशी आहे. ऑल इंडिया रेडियो मध्ये शास्त्रीय संगीत स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर येऊन राष्ट्रीय शिष्यवृत्ती त्यांनी सम्पादन केलेली आहे तसेच नेहरू सेंटर,मुम्बई आयोजित भारत डिस्कव्हरी स्पर्धेमध्ये त्या विजेत्या झालेल्या आहेत.

विष्णु दिगंबर पलुस्कर पुरस्कार, पं.विनायकबुवा पटवर्धन पुरस्कार, २०१५ चा इंद्रधनु सुधीर फड़के युवोन्मेष पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे.

स्वरभास्कर संगीत महोत्सव २०१६ या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा.श्री. प्रतापराव पवार असणार आहे. तसेच मा. शां.व.मुजुमदार यांची विशेष उपस्थिति असणार आहे. महोत्सवात रंग भरण्यासाठी स्वीकार कट्टी, अभिषेक बोरकर, पं.रामदास पळसुले, पं. शिधर पार्थसारथी, सौ.अपर्णा केळकर, उस्ताद शाहिद परवेज, अनुज मिश्रा आदी कलावंत उपस्थित राहणार आहे.


वैभव सुरेश कातकाडे
९५९५६९८७५९

No comments:

Post a Comment

पृथ्वी, मास्क, वजीर आणि बरंच काही...

Photo Credit : Priyanka Ghogare हा तुम्हाला ग्राफिक्स फोटो वाटतोय का ? वाटत असेल तर मग तुम्ही चुकलात, हा आहे आप...