Friday, June 30, 2017

वसंतराव नाईक

वसंतराव नाईक

स्थळ : शनिवार वाडा, पुणे

मुख्यमंत्री महोदयांची जाहीर सभा

जर येत्या दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मला याच शनिवारवाड्यासमोर फाशी द्या.असे जाहीर विधान करून शेतकऱ्यांप्रती असलेली तळमळ एका मातीतील मुख्यमंत्र्याने समोर आणली. त्या आदरणीय मुख्यमंत्र्यांच नाव वसंतराव नाईक. आज त्यांची जयंती.

राज्याचे तिसरे आणि सर्वाधिक काळ पदावर राहिलेले मुख्यमंत्री तसेच हरित क्रांतीचे प्रणेते आणि शेतकरी मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेले. शेती आणि शेतकरी हे त्यांच्या खूप जिव्हाळ्याचे विषय होते. कुठलाही विषय असो तो विषय शेतीपर्यंत नेऊनच संपवायचे.

राज्याच्या आजपर्यन्तच्या वाटचालीचा विचार करता यशवंतराव ते शरद पवार यांच्या कारकिर्दीची नोंद इतिहासाला घ्यावीच लागणार आहे परंतु या दोघांनाही जोडणारा दुवा म्हणजे वसंतराव नाईक ! संयुक्त महाराष्ट्र स्थापनेनंतर स्व.यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले. परंतु दोनच वर्षात त्यांना दिल्लीमधून बोलावण आलं. तेव्हा तत्कालीन महाराष्ट्रासमोर पुढचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न उभा न राहता संकेतांनुसार मारोतराव कन्नमवार यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आले. मारोतराव कन्नमवार यांच्या निवडीनंतर जेष्ठ साहित्यिक ग.दि.माडगूळकर वसंतराव नाईक यांना भेटायला ‘वर्षा’ या शासकीय बंगल्यावर गेले. न राहवून त्यांनी मनातील खदखद बोलून दाखविली कि यशवंतरावांना या बाबतीत एकदा तरी विचारायला हवं होत.. त्यावर नाईक साहेबांनी गदिमा यांना दिलेले उत्तर फारच वाखाणण्याजोग आहे. उत्तरादाखल वसंतराव म्हणतात, मी का विचारू यशवंतरावांना ? अधिकार हि मागून मिळणारी गोष्ट नाही. आपले काम त्या योग्यतेचे झाले कि अधिकार आपोआप आपल्याकडे येतात.

वसंतराव यांची जडणघडण ग्रामीण भागात, वंचित, उपेक्षित घटकांत झाली. त्यांच्या महाविद्यालयीन काळात वाचनातून त्यांवर महात्मा फुले यांचा प्रभाव पडला. समाजसेवेचा वसा घेतलेले, शेतकरी आणि शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळ असलेले म. फुले यांचा आदर्श घेऊन वसंतरावांनी आपले कार्य सुरु केले. शेतकरी आणि शेती टिकलीच पाहिजे या मतावर ते ठाम राहिले. बहुसंख्य समाज हा शेतीवर अवलंबून आहे. शेती टिकली तरच देश टिकेल या मताचे ते होते. कृषीवर आधारित पूरक उद्योगाला चालना म्हणून सुतगिरण्या, दुधउत्पादन सुरु केले. एक नव्हे तर तब्बल चार कृषी विद्यापीठे त्यांनी काढली. आणि सद्यस्थितीला चार हि विद्यापीठांमध्ये कृषी संशोधन, नवीन वाण तयार करणे हि कामे जोरात करत आहे. शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी राज्य बियाणे महामंडळ स्थापन करून योग्य बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले. आज सर्वच देशात मागेल त्याला काम या उद्देशाने उभी राहिलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजना सर्वप्रथम आपल्या राज्यात वि.स.पागे यांनी सुरु केली. या योजनेचे सर्व राज्यात अंमलबजावणी करण्याचे काम वसंतराव मुख्यमंत्री असताना झाले.

देशाचे माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांचे निधन झाल्यानंतर पंतप्रधान म्हणून कोणाला नेमायचे यासाठी वसंतरावांच्या शब्दाला त्या काळी वेगळीच किंमत प्राप्त झालेली होती. त्यावेळी वसंतरावांनी लालबहाद्दूर शास्त्री यांचे नाव सुचविले. आणि पंतप्रधान पदी विराजमान झाल्यावर लालबहाद्दूर शास्त्री यांच्या माध्यमातून शेती संदर्भात अनेक योजना तयार केल्या. मध्यप्रदेश मधून निवडणूक लढण्यासाठी कॉंग्रेस चे तिकीट मिळवून देण्यास लालबहाद्दूर शास्त्री यांनी वसंतरावांना त्या काळात मदत केलेली होती.

परीस्थिती कोणतीही असो, आपली भूमिका प्रांजळ आणि सदसदविवेकबुद्धीला अनुसरून असेल तर डगमगन्याचे मुळीच कारण नाही असे त्यांचे नेहमीचे वाक्य होते.

सन 1946 मध्ये पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. पुढे 1952 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मध्यप्रदेश मंत्रिमंडळात महसूल खात्याचे उपमंत्री, भू सुधार समितीचे उपाध्यक्ष झाले. 1956 मध्ये राज्य पुनर्रचनेनंतर जुन्या मुंबई राज्यात सहकार, कृषी, दुग्धविकासया खात्यांचे मंत्री म्हणून नियुक्त झाली. 1962 मध्ये तिसऱ्यांदा ते विधानसभेवर निवडून गेले आणि महसूल मंत्री झाले. आणि लगेचच 5 डिसेंबर 1963 रोजी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुरुवातीला मंत्री म्हणून ज्या शासकीय निवासस्थानात वास्तव्यास होते त्या ‘वर्षा’ या निवासस्थानाला अधिकृत दर्जा मिळून तो बंगला कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हनून ओळखला जाऊ लागला.

सलग साडेअकरा वर्ष त्यांनी सरकार चालविले तरी देखील कधी कोणत्या भ्रष्टाचाराच्या आरोपात किंवा बोलण्यातून कोणाला दुखावले गेले असे एकदाही नाही झाले. आपल्या सरकारचा कारभार हा लोकाभिमुख असायला हवा. सामान्य माणसाचा त्यामध्ये प्रामुख्याने विचार झाला पाहिजे. त्यांच्या कारकिर्दीत अनेक ठळक आणि शाश्वत निर्णय घेण्यात आले त्यामध्ये पंचायतराज संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी, कापूस एकाधिकार योजना, रोजगार हमी योजना, पानशेत पुरात वाहीन गेलेल्या सत्तर हजार घरांची मागणी, विधान सभा आणि विधान परिषद येथे विरोधी पक्षनेत्यांना देखील कॅबिनेट मंत्री या पदाचा दर्जा, ज्वारीची खरेदी मार्केटींग फेडरेशन मार्फत करण्याचा निर्णय, जिल्हा नियोजन समितीची स्थापना आदी महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले.

20 फेब्रुवारी 1975 रोजी त्यांनी आपल्या सलग साडेअकरा वर्षे सांभाळलेल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. पुढे ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले. दिनांक 18 ऑगस्ट 1979 रोजी सिंगापूर येथे वयाच्या 66व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

संदर्भ -: लोकराज्य (डिसेंबर 2012)

शब्दांकन -: वैभव सुरेश कातकाडे

katkade.vaibhav०४@gmail.com

2 comments:

पृथ्वी, मास्क, वजीर आणि बरंच काही...

Photo Credit : Priyanka Ghogare हा तुम्हाला ग्राफिक्स फोटो वाटतोय का ? वाटत असेल तर मग तुम्ही चुकलात, हा आहे आप...