Saturday, April 25, 2020

गोदामाई आज खळाळली..



गोदामाई आज खळाळली..

गंगापूर धरणातून निघाली तशी मोकळ्या वाटेने गेली, आज कोणी अंगा खांद्यावर खेळायला का येत नाही. म्हणून विचारात पडली.. एवढी स्मशान शांतता कधी अनुभवलीच नाही म्हणून कावरी बावरी देखील झाली.
ती धरणातून निघालीये समजताच सोमेश्वर धबधब्यावर एव्हाना कॉलेजच्या तरुण तरुणींची गर्दी झालेली असायची; मक्याचे कणीस खात, कॅमेरामध्ये फोटो काढून ते आनंद घेत असायचे; मग ती हि त्यांना फेसाळणारी पोज देऊन मोहक करून टाकत असे, आज का कुणास ठाऊक एवढी निरव शांतता का पसरली. जाऊद्या म्हणत ती पुढे निघाली;

नवश्या गणपती उजव्या बाजूला सारत पुढे सरकली.. बोटी का अशा ओसाड पडल्या आहेत, माझा गणु आज गर्दीत का नाही ? म्हणून आश्चर्य करायला लागली.. याला तर गर्दीत राहून भाव खायची सवय आहे आणि आता असा का शांत झालाय म्हणून विचारात पडली..

मनात विचार करत पुढे निघाली, सावरकरनगरच्या बापू पुलावर टोणगे मजा करत असतील; बड्या बापाचे पोरं गाड्या उडवत असतील असा विचार मनात आणून कुत्सित हास्य आणून पुढे निघाली, बापू पूल जवळ आल्यावर भयानक शांतता तिला जाणवली, अरेच्या आज इथे कोणीच नाही.. गेल्या वर्षी माझ्या रौद्र रूपाने इथलं उध्वस्त झालेलं आता पुन्हा कसं राहिलंय हे बघत बघत पुढे सरकली..


Photo Credit : Keshav Mate



केटीएचएम कॉलेजच्या बोटक्लब वर कोणीतरी नक्की असेल; रोइंग करणारे किंवा परीक्षा असल्याने पेपरच्या आधी रिव्हिजन करणारे तर नक्कीच असतील असा भाबडा विश्वास घेऊन निघाली, पण तिला काय माहित लॉकडाऊनमुळे सारं कॉलेज शांत झालंय, मुलांना परीक्षा न घेताच पुढच्या वर्गात पाठवलंय..

आता मात्र हिरमुसली, आणि चीड चीड करायला लागली, तोवर सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर लागले.. लगबगीने पुजारी तांब्याची कळशी घेऊन पाण्यात येताना दिसला आणि तिला थोडं हायसं वाटलं, माझ्या नाशिकमध्ये कोणीतरी आहे हि भावना तिला समाधान करून गेली, पुजाऱ्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या त्याने कळशी भरली आणि सिद्धेश्वरला तिचा अभिषेक केला.. आणि महादेवाकडे मागणं मागितलं, जगाला वाचीव असं काहीतरी पुटपुटला..

तिला आता थोडी भीती जाणवायला लागली, नक्की काहीतरी विपरीत घडत असल्याचं जाणवायला लागलं.. व्हिक्टोरिया छे छे... अहिल्याबाई होळकर पुलाजवळ आली.. पुलाकडे बघितले तर एकही माणूस तिला बघायला नाही.. एक भीतीयुक्त शांतता अनुभवली..

शहरात कोणीही कुठेही असो किंवा नसो पण रामकुंडावर मात्र कोणी न कोणी असतेच.. असा विचार करून निघाली.. गांधी तलाव शांत निद्रेत होता.. गांधी ज्योत तर ओसाड पडली होती. दशक्रियेचा घुमट निपचित कोपऱ्यात पडल्यासारखा भासत होता..

Photo Credit : Yatish Bhanu

पोहचलीच ती रामकुंडावर.. एवढ्या उन्हात रामकुंडावर तिच्यावर उड्या मारणारे आज कोणीच नाही..आता मात्र तिथली कधीही न अनुभवलेली शांतता, रामकुंडाचा तो एकाकीपणा बघून तिचा बांध फुटायला लागला होता.. बाणेश्वर महादेव, साई बाबा मंदिर सर्व बंद.. कपालेश्वर महादेव तर... असा विचार येऊन ती आवाज देऊ लागली, कपालेश्वर महादेवा, आहेस कुठे रे बाबा? याच साठी जटा आपटून तुम्ही मला ब्रम्हगिरीच्या कुशीतून आणले होते ? अहो, ज्यांच्यासाठी तूम्ही मला आणलं ते आहेत तरी कोठे ?... गेल्यासाली तुमच्याजवळ पार वरती आली होती मी.. आठच पायऱ्या बाकी असताना तुम्हीच बोलले होते ना अजून वरती नको येऊ; माझं शहर पाण्यात जाईल...मीच येतो भेटायला.. मग आता कुठे आहेत ते शहरातले लोकं.. कि येऊ मी वरती म्हणजे माझ्या लेकरांना मला भेटता येईल..शहरभर फिरता येईल..

कपालेश्वर भोलेनाथ अगदी शांत मुद्रेत स्मित हास्य करत आशीर्वादाचा हात दाखवत होते.  

ते संयमी रूप बघून आता मात्र ती चिडली, राग कोणावर काढणार तर समोर दुतोंड्या मारुती दिसला.. आणि तिचा सगळा रागाचा बांध तिथेच फुटला..

Photo Credit : Navin Kamod

 
लेकरं कुठे रे माझी ? तुला सांभाळायला काय झालं ? ते येत का नाही अजून मला भेटायला ? तुला विचारतीये रे मी.. अरे, तुच साक्षीदार होता न प्रभूरामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या सान्निध्यापासून ते आजपर्यंत मला माझ्या पिल्लांपासून कोणी लांब केलेले नाहीये.  तूच साक्षीदार आहेस, लाखोंचा कुंभमेळा मी माझ्या अंगावर कित्येक वर्षांपासून खेळवते.. तूच साक्षीदार आहेस.. मग आज कुठे गेले सगळे ? असा रागात प्रश्नांचा भडिमार करत होती.

दुतोंड्या मारुती मग शांतपणे बोलला, माऊली जगात विषाणूने कहर केलाय म्हणून कोणी घराबाहेर नाही. सगळे व्यवहार ठप्प झालेत, घाटावर भरणारा बाजार तुला काही नवीन नव्हता पण आता तो हि नाही.. माझ्या प्रभूचा रथ सुद्धा यावेळी निघाला नाही.. माझ्या प्रभूचा जन्मदिन पण शांततेतच गेला.. असं सांगताच डोळ्यात आसवे जमा झाली.. ती पुसून पुढे म्हणाला, माऊली हे संकट सगळीकडेच आलंय.. लोकांनी स्वतःच्या संरक्षणासाठी घरीच थांबणे योग्य आहे.. थोडा आवर घाल स्वतःला.. बरं झालं तू आलीयेस.. आता तूच मार्ग काढ यातून.


भावनिक साद ऐकून गोदाई पण शांत झाली एखाद्या संन्याशासारखी.. काय बोलू आता अशी अवस्था झाली तिची, मग धीर करून बोललीच.. हनुमंता, किती सुंदर वातावरण असायचे रे पूर्वी.. दुतर्फा झाडे, प्राणी पक्षी तर आरामात गुण्यागोविंदाने खेळायचे, बागडायचे.. हळू हळू विकास झाला..सिमेंटच शहर झालं.. मला हि याच माझ्या लेकरांनी बंधनात अडकवलं.. राग तो नाहीये रे मनात.. आणि माऊली कधी राग धरते का.. आता ही वेळ माझ्या लेकरांवर आलीये.. मला बघवत नाहीये पण त्यांना जाणीव तर होऊ दे.. या निसर्गाने किती उपकार करून ठेवले आहेत. थोडे दिवस सोसूदेच त्यांना असं म्हणत तिने डोळे पुसले.. नाटकी हसू आणलं चेहऱ्यावर आणि दुतोंद्याला म्हणली.. सर्व काही सुरळीत होईल, तू मात्र काळजी घे..
यावर्षीही तुला 3 4 वेळा मस्तकाभिषेक करणार आहे मी...

दुतोंड्या मारुतीला समजले, डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू आणत त्यानेही गोदा माऊलीला निरोप दिला..
अशा रीतीने आज गोदामाई खळाळली.. आज गोदामाई खळाळली.. 
- वैभव सुरेश कातकाडे, नाशिक
09595698759

No comments:

Post a Comment

पृथ्वी, मास्क, वजीर आणि बरंच काही...

Photo Credit : Priyanka Ghogare हा तुम्हाला ग्राफिक्स फोटो वाटतोय का ? वाटत असेल तर मग तुम्ही चुकलात, हा आहे आप...