शारीरिक क्षमतेेबरोबरच मानसिक क्षमता,संयम यांची कसोटी बघणारी एकमेव स्पर्धा म्हणजे मॅरेथॉन शर्यत होय. आज (दि.८) मराठा विद्या प्रसारक समाज संस्था ही जिल्ह्यातील नावजलेली शैक्षणिक संस्था चौथी राष्ट्रिय आणि नववी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करीत आहे. त्यानिमित्त मॅरेथॉनचा इतिहास,जागतिक तसेच देशांतर्गत होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धा आणि राष्ट्रीय विक्रम यांचा घेतलेला थोडक्यात आढावा...

सन् १८९६ मध्ये पहिल्यावहिल्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये लोकांच्या अभिमानी ऐतिहासिक कथेचे ग्रीकवासियांच्या दृष्टीने असलेले महत्व लक्षात घेऊन ऑलिम्पिक स्पर्धेच्या आधी मॅरेथॉन पठार ते ऑलिम्पिक क्रीडानगरीपर्यन्त धावणे अशी सूचना प्रा. मायकेल ब्रीअर्ली यांनी मांडली आणि सर्वानुमते तीला संमति देऊन त्याची अंमलबजावणीही केली. तेव्हापासून'फिडिफिड्स' या योध्याला मानवंदना म्हणून ही शर्यत ठेवली जाते आणि हि स्पर्धा प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणारे प्रा.ब्रिअर्ली याना या शर्यतीचा जनक असे सम्बोधले जाऊ लागले.
या शर्यत ४२.१९५ किमी अशा विचित्र अंतराची आहे आणि विशेष म्हणजे हे अंतर देखील मान्यताप्राप्त असे आहे. या विचित्र अंतराची कहाणी देखील मजेशीर आहे. सन १९०८ लंडन ऑलिम्पिकमध्ये या शर्यतीचा शेवट इंग्लंडच्या राजघराण्यातील सदस्यांना बघता यावा याकरिता या अंतरात वाढ करण्यात आली. त्यामुळे या शर्यतीचा रोमांचकारी अंतिम क्षण राजगृहाजवळच झाल्याने राजगृहातील सदस्यांना याचा आनंद घेता आला. म्हणून या स्पर्धेचे अंतर ४२.१९५किमी झाले. १९२१ पासून या स्पर्धेचे हेच अंतर आंतरराष्ट्रिय ऑलिम्पिक संघटनेकडून अधिकृत करण्यात आले. यासाठी आयएएफ ने प्रस्तुत प्रसंगाचा आधार घेतला.

जागतिक स्तरावरील बोस्टन मॅरेथॉन सर्वात जूनी म्हणजे १८९७ पासून चालत आलेली तर जर्मनिमधील गुरबर्ग मॅरेथॉन ही रात्रीच्या वेळी भरविण्यात येणारी मॅरेथॉन आहे. भारतामध्ये मॅरेथॉन शर्यतीची सर्वप्रथम चाचणी १९२० मध्ये घेण्यात आली तर आंतरराष्ट्रिय शर्यतीचा श्रीगणेशा दिनांक २५ सप्टेंबर १९७३ रोजी पुण्यामध्ये झाला. आपल्या देशातील'स्टॅन्डर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन' तसेच 'पुणे मॅरेथॉन' या आंतरराष्ट्रिय मॅरेथॉन शर्यती म्हणून ओळखल्या जातात. मुम्बई मॅरेथॉन शर्यतीला 'मॅरेथॉन असोसिएशन ऑफ़ इंटरनॅशनल मॅरेथॉन अँड रोड रेसेस' या आंतरराष्ट्रिय संघटनेने 'गोल्डन लेवल रेस'असा दर्जा दिलेला आहे.
भारताने १९२० च्या अँटवर्प ऑलिम्पिकमध्ये पी.एफ. चौघुले यांच्या रूपाने मॅरेथॉन मध्ये प्रवेश केला. तसेच २०१६ च्या रियो ऑलिम्पिक मध्ये कविता राऊत-तुंगार यांनी ऑलिम्पिक मध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले. भारताचा राष्ट्रिय मॅरेथॉन शर्यत विक्रम शिवनाथ सिंह यांच्या नावावर असून त्यांनी २ तास ११ मिनिटे १५ सेकंद या वेळेत ही शर्यत पार केली.
उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या मविप्र ने २००९ पासून या शर्यतीचे आयोजन करण्यास सुरुवात केली. समाजात आरोग्यविषयी सजगता निर्माण व्हावी, एक आरोग्यसंपन्न सुदृढ़ समाज निर्माण व्हावा या उद्देशाने स्व.वसंत पवार यांनी ही स्पर्धा सुरु केली. स्व. पवार यांनी या स्पर्धेची सर्व जबाबदारी तत्कालीन शालेय क्रीडा शिक्षक आणि सध्या संस्थेचे क्रीडाधिकारी प्रा.हेमंत पाटील यांच्यावर सोपविली. प्रा.पाटील यांनी देखील या जबाबदारीकडे एक संधी म्हणून बघितले. आणि त्याचमुळे दरवर्षी सांघिक कामाचे उत्तम उदाहरण म्हणून या स्पर्धेकडे बघता येईल असे नियोजन करून हि स्पर्धा यशस्वी केली जाते. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सध्या संस्थेच्या सरचिटणीस आदरणीय नीलिमाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म नियोजन केलेले असते. Run For Health and Build The Nation हे ब्रीदवाक्य घेऊन ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय आयोजनासाठी मार्गक्रमण करीत आहे.

रियो ऑलिम्पिक मॅरेथॉन शर्यतीमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या नाशिकच्या खेळाडू कविता राऊत-तुंगार, देशांतर्गत अनेक स्पर्धा गाजविणाऱ्या मोनिका आथरे, दुर्गा देवरे, अंजना ठमके, किसन तडवी, दत्ता बोरसे, संजीवनी जाधव यांच्यासारख्या खेळाडूंचा पाया खऱ्या अर्थाने मविप्र मॅरेथॉन ने घातला. नाशिक ही संतांची भूमी, यंत्रभूमी, तंत्रभूमी याबरोबरच मविपर मॅरेथॉन, नाशिक रन यांसारख्या स्पर्धांमुळे क्रीड़ाभूमी म्हणून नाशिक शहराने आपली ओळख अधिक ठळक केलेली आहे.
No comments:
Post a Comment