Monday, January 6, 2020

विश्वस्त - एक रहस्यभेद


विश्वस्त - एक रहस्यभेद

इतिहास.. जो की घडुन गेला आहे. पण हाच इतिहास असा देखील आहे की जो तुम्हाला उलगडवायला भाग पाडतो. मग तो ठरवून उलगडावा लागतो अथवा अपघाताने.. 

उत्कंठावर्धक आणि रहस्यमय कादंबरी लिहिण्यासाठी इतिहासकालीन घटनांचा पुरेपूर वापर केला जातो. इंग्रजीमध्ये तर अश्या शेकडो कादंबऱ्या सापडतील. मराठी मध्ये सुद्धा या आशयाच्या कादंबऱ्या आहेतच त्यापैकीच एक म्हणजे विश्वस्त... हि ऐतिहासिक कादंबरी नसली तरी इतिहास उलगडण्यासाठी इतिहास, भूगोल, मिथके, अनुमाने आणि कल्पित यांवर आधारलेली आहे. इतिहास खरंच घडला आहे कि नाही याच्या अगदी जवळ जाऊन वाचकाला निःस्तब्ध करून ठेवणारी आहे. यामध्ये विश्वस्त ते वारसदार हा रहस्यमय प्रवास.. हा प्रवास होत असताना नक्की वारसदार कोण आहे ? विश्वस्त कोण आहे ? त्यामध्ये राजकीय व्यक्तिमत्वाची पात्रता आहे का ? गिर्यारोहण करणाऱ्या जेएफके टीम ला जे पाहिजे ते साध्य होत का ?  कि त्यांचे बलिदान असेच वाया जाते.. असंच काहीसं  खिळवून ठेवणारं कथानक वसंत वसंत लिमये लिखित विश्वस्त या कादंबरीमध्ये दडलंय.

रहस्यमय, थरारक आणि वास्तवाच्या अगदी जवळ जाण्यासाठी खिळवून ठेवणारी ही विश्वस्त म्हणजे आपल्या इतिहासाला खरं रूप देण्याचा प्रयत्न. आजच्या काळात फक्त म्हटलं जातंय की, इतिहास हा वाचवला गेला पाहीजे, सांभाळला पाहिजे पण प्रत्यक्षात 5 ते 10 % च प्रयत्न करत आहेत. कादंबरीमधील जेएफके टीम (जस्ट फॉर किक) अशीच हॉटेल मध्ये रमणारी भटकंतीची आवड असणारी आणि काहीतरी नवीन करण्याची जिद्द असलेली पाच जणांची टीम. ह्या टिमचा एकच ध्यास म्हणजे इतिहासकालीन घटना शोधणे, त्यांचा संदर्भ लावण्यासाठी वाटेल ते करणे आणि तो संदर्भ तंतोतंत जुळविण्याचा प्रयत्न करणे. हे सगळं करत असताना मात्र स्वतःच्या प्रोफेशनला हि धक्का न लागू देणं.




लेखकाने या कादंबरीमध्ये २०१३-१४ या एक वर्षातील कालावधी घेतला आहे; परिणामी या एक वर्षाच्या काळात घडणाऱ्या सामाजिक राजकीय घटनांचा उहापोह देखील वाचकाला एक वेगळीच अनुभूती देऊन जातो. यातील कालावधी जरी ठराविक एक वर्षाचा असला तरी कादंबरीच्या पहिल्या प्रकरणामध्येच वाचक थेट महाभारत कालीन श्रीकृष्णाच्या एका आगळ्यावेगळ्या रुपाकडे जाऊन पोहचतो. जो श्रीकृष्ण  आपल्या सर्वांपासून खूप दूर राहिला आहे. कारण आपल्याला माखनचोर, गोपिकांचा प्रेमी आणि गीता सांगणारा असा श्रीकृष्ण ठाऊक आहे. पण, कादंबरीमधील वृद्ध श्रीकृष्ण वाचताना नक्की जाणवते कि, इतिहासानेही असा श्रीकृष्ण रंगवताना हात आखडता घेतला असावा. आणि याचमुळे कादंबरीचे वाचन सुरु ठेवण्याची उत्कंठा वाढते.

दुर्गभांडार या नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील आणि सह्य पर्वत रांगेतील सुरुवातीचा दुर्ग. येथून दोन पुराणकालीन ताम्रपट जेएफके टीम ला सापडतात. मात्र, त्यावर कोरलेली ब्राम्ही लिपीतील संस्कृत श्लोक शोधताना हा प्रवास सुरु होतो. या टीम मधील जेऑन, अनिरुद्ध, प्रसाद, मकरंद आणि शबीर असे सर्वच एकापेक्षा एक. जेऑन परदेशातून खास ‘भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील इतिहास’ या विषयात विद्यावाचस्पती हि पदवी मिळविण्यासाठी पुण्यात आलेली असते तर शबीर पुण्यातीलच भारतीय चित्रपट संस्थेमध्ये असतो. बाकी मकरंद, अनिरुद्ध आणि प्रसाद गिर्यारोहनामधील किडे असतात. कारण गिर्यारोहण आणि भटकंती हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय.

सापडलेले ताम्रपट आणि त्यांतील असलेल्या श्लोकांचा लावण्यासाठी सुरु असलेली धावपळ यातून एक इतिहास उलगडण्याचा प्रयत्न ते करत असतात. हे सारे नेटाने सुरु असतानाच अचानक बाका प्रसंग उभा राहतो आणि त्याचा फायदा घेत त्यांची भेट एका राजकीय व्यक्तिमत्वाची होते. हि तीच राजकीय व्यक्ती असते ज्या व्यक्तीला अखंड भारताची सत्ता पाहिजे आहे, आणि त्यासाठी साम,दाम, दंड आणि भेद सर्व राजकीय नीती वापरण्यास तो तयार असतो. अचानक झालेली हि एन्ट्री वाचकाला धक्का देऊन जाते. लेखकाने या धक्कातंत्राचा फारच खुबीने वापर केलेला दिसून येतो. या धक्कातंत्राला सिनेमी भाषेत इंटरकट म्हणतात; हा इंटरकट म्हणजेच श्रीकृष्णाचं प्रकरण सुरु असताना अचानक वास्तवात येणं, तिथून पुन्हा चाणक्य, महमूदचा गझनी यांना जाऊन भिडनं. स्थळ काल यांचे विवरण अचानक बदलून पुन्हा वाचकाला वास्तवात घेऊन येणं आणि ते हि कादंबरीच्या मुख्य गाभ्याला कोणताही धक्का न लावता. हे एकंदरीत कादंबरीचे आणि साहजिकच लेखकाचे यश आहे. 

द्वारावेस्तु संपत्ति: साधकाय सुपात्रिणे |

लोककल्याणकार्यार्थ प्राप्यते निर्ममाय च ||१||


संपत्तीरेषा सोमाय शिवाच्छापविमोचनम |

लब्धं यत्र तू तत्रैव गुरुशन्योर्युताविह ||२||


प्राथम्ये भे च तत्पुर्वौ किर्तीक्यां कृष्णपक्षके |

तृतीयायां तिथौ रात्रौ काले सोमोदयात्मके ||३||


नाम्ना कीर्तीमुखात ज्ञानं गवाक्षात चन्द्ररष्मितु |

प्रकाशं याति संपत्तेरानुकुल्यपरीस्थितौ ||४||


अतीते बहुकालेSपि चानुकूले प्रवर्तीते

यथारविन्दकन्दाच्च श्लोकार्थ: प्रकटीभवेत ||५||

सापडलेल्या श्लोकांचा शोध घेत असताना त्यांना काही भव्य दिव्य भेटेल याची सुरुवातीला कल्पना सुद्धा नसते; या पाच श्लोकांमध्ये द्वारकेच्या वैभवाचा उल्लेख आढळतो तसेच हे सारं वैभव एका निर्मोही, सत्पात्री साधकाला देण्यात यावं आणि ते हि कसं द्यावं याचा एक कोडेड मेसेज, स्पेसिफिक लोकेशन आणि स्पेसिफिक वेळ दिलेली आहे. श्लोकांमधील सत्पात्र, निर्मोही आणि साधक हि विशेषण तसेच इतर बाबी याचाच आधार घेत जेएफके अशा एका वळणावर पोहचते जेथून त्यांना धड पुढेही जाता येत नाही मागे हि फिरता येत नाही. सोबतचे काही साथीदार त्यांना सोडून जातात तर काही राजकीय, भांडवलदार व्यक्ती त्यांचा फायदा करून घेण्यास तयार असतात. राजकीय व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी पक्षाचा किती वापर करते याचाही सध्याच्या परिस्थितीशी सांगड घालत लेखकाने अनुरूप मांडणी केलेली दिसते.
  
श्रीकृष्ण-उद्धव, चाणक्य-चंद्रगुप्त, रामदास स्वामी-शिवाजी महाराज हा जो काही गुरु शिष्य, विश्वस्त वारसदार यांचा प्रवास आहे तोच या विश्वस्त पुस्तकाने पुढे आलेला आहे. कादंबरीमध्ये असलेल्या कालावधीत राजकीय परिस्थितीचा पुरेपूर वापर करून अतिशय रोमांच उभे करणारे प्रसंग आहेत. यासाठी लेखकाने महाभारतकालीन द्वारका, पाटलीपुत्र, सोमनाथ मंदिर, महमूद गझनी, स्कॉटलंड, टेक्सास आदी ठिकाणांचा जिवंत प्रसंग उभा केलेला आहे.



जेएफके टीमला त्यांच उद्दिष्ट पूर्ण तर करायचं असत पण योग्य वारसदारापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर असते. कादंबरी मध्यापर्यंत येते तोवर वाचकाला देखील समजत नाही कि नक्की कोण या कादंबरीचा नायक आहे. अगदी शेवट शेवट सगळी कादंबरी वाचून संपायला येते तेव्हा समजते आणि वेगवान घडामोडींनी कादंबरी पूर्णत्वाकडे पोहचते. कादंबरी वाचून झाली तरी देखील अजून पुढे काय ? हा प्रश्न वाचकांना पडतो आणि हेच या कादंबरीचे वैशिष्ठ्य होय. कादंबरीमधील विश्वस्त ते वारसदार हा जो प्रवास आहे त्यात प्राचीन मध्ययुगीन अशा अनेक गोष्टींचे संदर्भ आहेत. त्यासोबतच सद्यपरिस्थितीतील अनेक राजकीय, सामाजिक संदर्भही आढळतात. अज्ञात इतिहास, वर्तमान वास्तव, कल्पित आणि सत्य यांमधील पुसट धूसर सीमारेषांवर खेळणारी आणि वेगवान घडामोडींच्या प्रवाहात वाचकाला घेऊन जाणारी सोबतच खिळवून ठेवणारी अशी हि विश्वस्त पाचशे सव्वा पाचशे पानांची जरी असली तरी दोन किंवा जास्तीत जास्त तीन बैठकीमध्ये संपवू शकतो.

या कादंबरीबद्दल अजून एक वैशिष्ठ्य असे कि मराठी साहित्याचा विचार करता पहिल्यांदाच कुठल्या तरी मराठी कादंबरीवर ट्रेलर/टीझर प्रकाशित झालेला असेल तर तो विश्वस्त या कादंबरीचा आहे.

 ट्रेलर बघण्यासाठी क्लिक करा...

जेएफके चा हेतू साध्य होणार का ? वारसदार झालेले विश्वस्तापर्यंत पोहचणार का ? विश्वस्त होण्यासाठी आतुर असलेला तेवढी पात्रता म्हणजेच सत्पात्री निर्मोही साधक म्हणून कसोटीला उतरेल का ? कोण कोणत्या राजकीय घटना यात येतात ? कोण कोणत्या दृश्य अदृश्य शक्ती यात सामील असतात ? आणि  अखेरचा प्रश्न नक्की त्रिपुरारी पौर्णिमेनंतरच्या तृतीयेचे महत्व काय ?
तर नक्की वाचा... विश्वस्त

वैभव सुरेश कातकाडे (९५९५६९८७५९)
संहिता लेखक
विभागीय माहिती कार्यालय, नाशिक

Wednesday, January 1, 2020

पोलीस स्थापना दिवस

                                                                          पोलिस

हा शब्द ऐकताच प्रत्येक नागरिक ज्या दिशेने आवाज आला त्या दिशेने नजर टाकतो. अर्थात त्याला आपल्या देशवासियांची मानसिकताच कारणीभूत आहे. कारण जिथे पोलिस तिथे काहीतरी गड़बड़ आहे हे आम्ही देशवासियांनी मनात पक्के करुन घेतले आहे.


हे पोलिस तेच असतात जे आरोपीकडून गुन्हा कबूल करुन घेतात. हे पोलिस तेच असतात जेव्हा कायदा आणि सुव्यवस्था हा प्रश्न ऐरणीवर आल्यावर आपला दंडुका बाहेर काढ़तात. प्रसंगी आपल्या प्राणांचीही परवा करत नाही. यांना कौटुम्बिक जीवन नसतेच. कारण महाराष्ट्र पोलिस यांचे ब्रिदवाक्यच आहे...सदरक्षणाय खलनिग्रहणाय..


अश्या या पोलिस दलाचा आज स्थापना दिन. या दिनाचा इतिहासही रंजकच आहे..


मुंबई पोलिस दलाची निर्मितीची कहानी फारच रंजक आहे. सात बेटांचे संरक्षण करण्यासाठी १६७२पासून रक्षक नेमले गेले. भंडारी ब्रिगेड नावाची ही फौज १७ फेब्रुवारी १७७९ मध्ये अधिक शिस्तबद्ध होत त्यातून मुंबई पोलिस दल निर्माण झाले.

पुढे महाराष्ट्र पोलिस दल २ जानेवारी १९६१ रोजी स्थापन झाले. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान केला, तोच पोलिस दलाचा स्थापना दिन.

महासंचालक संजीव दयाळ यांच्या पुढाकारातून २०१६ पासून हा 'स्थापना दिन' साजरा होतो.

 स्वातंत्र्यानंतर पोलिस दलात बरेच बदल झाले, तरी आजही त्यांच्याबद्दल फारसे कोणी चांगले बोलत नाही. यासंबंधी फ. मुं. शिंदे यांची 'पोलिस नावाचा माणूस' ही बोलकी कविता आहे. त्यात पोलिसांची व्यथा त्यांनी मांडली आहे.

पोलिस दलाचे ऋण फेडण्यासाठी एकदा तरी पोलिस म्हणून जन्म घ्यावा लागेल. कारण पोलिस म्हणून जगत असताना स्वतः आणि समाज वेगळा नसतोच. त्यात वेळ प्रसंगी समाजासोबतही दोन हात करावे लागतात.
दिवाळी दसरा गणपती हे सण उत्सव तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना...पोलिसांना फक्त एकच सण...कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण..


त्यांच्या अंगावरची वर्दी कोणीही एरागबाळा चढवू शकत नाही ती वर्दी अंगावर चढ़वण्याची पात्रता फक्त त्याच्याच अंगी असते जो त्याग करण्यास सदैव तयार असतो.

अश्या या पोलिस दलाला स्थापना दिनाच्या शुभेच्छा आणि मनःपूर्वक वंदन...
जय हिंद...।

सदर पोस्ट आपण देशदूत ऑनलाईन पोर्टल वर देखील वाचू शकता. क्लिक करा..

-वैभव सुरेश कातकाडे
९५९५६९८७५९/७०२००१६३९६
नाशिक.

Monday, December 16, 2019

विजय दिन

विजय दिन

१६ डिसेंबर हा दिवस प्रत्येक भारतीय संरक्षण दलाच्या जवानाच्या तसेच बांग्लादेशच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. १९७१मध्ये याच दिवशी भारताने पाकिस्तानविरूद्धच्या युद्धात निर्णायक विजय मिळवला आणि बांग्लादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती केली.

पाकिस्तानच्या वतीने लेफ्टनंट जनरल ए.के. नियाझी यांनी ले. जनरल अर्जुन सिंह अरोरा यांच्या समोर शस्त्र (पिस्तूल) खाली ठेवून शरणगतिपत्रावर सही केली. या शरणागतीमध्ये पाकिस्तानचे ९३०००सैनिक सामिल होते.

भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लगेचच संसद भवनात बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व जगाच्या नकाशावर बांगलादेश हा नवीन देश उदयास आला. १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी या राष्ट्राचा समावेश संयुक्त राष्ट्रामध्ये करुन घेतला.

या युद्धाला तशी सुरुवात २५ मार्च १९७१ मध्येच झाली होती. पश्चिम पाक ने ऑपरेशन सर्चलाइट सुरु करुन पूर्व पकिस्तान मधील आंदोलनकर्त्यांचे अनन्वित अत्याचार सुरु केले होते. यातूनच आंदोलनकर्त्यांनी बांग्लादेश मुक्ति वाहिनी नावाने संघटना उभारून पाक सैन्याविरुद्ध तोंड देण्यास सुरुवात केली. भारताने बांग्लादेश मुक्ति वाहिनीला मदत पुरविली.

याच वर्षी डिसेंबर मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कलकत्ता येथे सभा सुरु असताना पाक सैन्याने भारतीय हवाई तळांवर हल्ले सुरु केले. पंतप्रधान गांधी तातडीने दिल्लीच्या दिशेने निघाल्या पण दिल्ली मध्ये ब्लॅकआउट असल्या कारणाने त्या दिल्ली मध्ये पोहचु शकल्या नाही. लखनऊ येथून त्यांनी सर्व सूत्र हलविन्यास सुरुवात केली. आणि अखेर 3 डिसेंबर रोजी भारतपाक युद्धाचा नगारा वाजला. पाकिस्तानने यात भारतीय ११हवाई तळांवर हल्ले केले. भारताने पूर्वीकडे बांग्लादेश मुक्ती वाहिनीला मदत तर पश्चिमेकडे आर्मीद्वारे आक्रमण असा पवित्रा घेतला. त्यामुळे सलग १३ दिवसरात्र चाललेल्या युद्धात पाकिस्तान सैन्याला हार पत्कारावी लागली.

ही हार पाकिस्तानला चटका लावून गेली आणि भारत या  आमच्या शेजारील राष्ट्राने आमच्या देशाचे दोन तुकडे केले अशी पाकिस्तानी जनमानसात अजूनही भावना आहे.






पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रप्रमुख याह्याखान यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. कालांतराने बांगलादेशचे निर्माता शेख मुजिबूर रहमान यांची मुक्तता करण्यात आली. १० जानेवारी १९७२ रोजी मुजिबूर रहमान परत बांगलादेशात आले.

या युद्धात भारताचे जवळपास ४ हजार सैनिक कामी आले. भारताने पाकिस्तानचे ९० हजाराहून अधिक सैनिक व समर्थक युद्धबंदी बनवले. या युद्धात आजवरच्या इतिहासात उपखंडातील सर्वात जास्त प्रमाणात झालेले मानवी शिरकाण मानवतेला काळीमा फासनारे असे होते. यात मुख्यत्वे बांगलादेशातील हिंदूंना मारण्यात आले.

३ डिसेंबरला सुरू झालेले भारत-पाकिस्तानमधील हे तिसरे युद्ध १६ डिसेंबरला संपले खरे पण या दोन देशांमधील वैमनस्य मात्र आजही संपलेले नाही.

कारगीलची घुसखोरी व वारंवार होणाऱ्या घातपाताच्या घटना पाहता हे वैर इतक्यात संपण्याची शक्यताही नाही.

१९७१च्या युद्धाचा ४६वा विजय दिन साजरा करताना सीमांवर सदैव दक्ष राहणाऱ्या भारतीय जवानांना मानाचा सलाम !

जय हिंद..।

Sunday, August 18, 2019

चहावेळा.. कालच्या आणि आजच्या

चहावेळा.. कालच्या आणि आजच्या

‘कभी कभी मेरे दिल मे, खयाल आता हे...’ हे रेडीओ वरचं गाणं सुरु झालं आणि माझं मन अलगद माझ्या पूर्वायुष्यात गेलं...
आठवले ते दिवस जेव्हा ती म्हणजे माझी सौ आणि मी सायंकाळी ठीक पाच वाजता गणपतबाबांच्या रेस्टॉरंटवर भेटायचो. तिची शाळा ठीक चार वाजता सुटायची, साडेचार पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली करून शाळा बंद करण्याची जबाबदारी ती फार नेटाने पार पाडायची; आणि साधारण पावणे पाच ते पाच पर्यंत ती रेस्टॉरंटवर पोहचायची. मी माझे कंपनीतले काम आटोपून सर्व मित्रमंडळींना लवकर फाटा देऊन रेस्टॉरंटला पोहचायचो. कधी कधी उशीर व्हायचा तेव्हा ती रेस्टॉरंटच्या बाहेर रस्त्याच्या कडेला हाताची घडी घालुन वाट बघायची अर्थात चेहऱ्यावर लटका राग असायचाच, पण का कुणास ठाऊक, मलाही तिचा लटका राग बघण्याचा योग जुळवून आणण्याकरिता मुद्दाम विलंब करावासा वाटायचा...अन मग तो राग मनविण्यासाठी गणपतबाबांचा चहा आणि तिला आपुलकीने विचारलेला एक प्रश्न, “काय मग सरकार, कसा होता आजचा दिवस?” या दोन गोष्टी पुरेश्या असायच्या.
मग सरकार या शब्दावरून ती तिची हुकुमत गाजवायची. अर्थात मलाही तेच हवे असायचे. तोवर चहा आलेला असायचा मग तो गरमागरम वाफाळलेला चहाचा कप हाती घेऊन दिवसभर घडलेल्या गोष्टी माझ्यापुढे मांडायची. कधी हसायची, कधी आवाजाचा स्तर वाढवून बोलायची. तिच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली एखादी कलाकृती फार कौतुकाने सांगायची. टिपिकल शिक्षकी पेशा असलेली माझी बायको घरातील सर्व गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायची.

तसं आमचं घर खटल्याचं होतं. घरात माझे दोन भाऊ, त्यांच्या बायका, त्यांची मुलं असा राबता असायचा. आम्ही घरात थोरले होतो. थोरले म्हटल्यावर त्याग आणि जबाबदारी या दोन गोष्टी आम्ही प्राधान्याने स्वीकारल्या होत्या. त्यात तिने कधी काही गाऱ्हाणी केली आहे असं मला आठवून आठवून सुद्धा आठवणार नाही. आमच्या सुखी कुटुंबाला फक्त एकाच गोष्टीची कमी होती. ते म्हणजे अपत्य; परंतु भावांची मुलं ती आपलीच मुलं हा जणू नियमच आम्ही स्वतःला घालून घेऊन येणाऱ्या उद्याची वाटचाल करायचो.
खटल्याच्या घरात एकांत मिळणे कठीण म्हणून आम्ही न ठरवताच गणपतबाबांचा चहा आमच्या भेटीचा सुवर्णमध्य झाला होता; आणि रोजनुसार गणपतबाबांना देखील आमची सवयच झालेली होती.
चहा झाल्यावर बिल कोणी द्यायचे तर हसून आणि हक्काने तिचे वाक्य असायचे, “आज तुम्ही द्या, उद्या मी देईन.” तिच्या उद्याची मी अजूनही वाट बघतोय. उभ्या आयुष्यात माझ्याच काय पण संपूर्ण कुटुंबाच्या उद्यासाठी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणारी माझी बायको मनाने फार भक्कम होती.
बिल दिल्यावर ती रस्त्यात थांबायची..अन मग मी माझी जुनी स्कूटर (M.E.T.) घेऊन यायचो...मोजून तिसऱ्या किक मध्ये ती सुरु व्हायची. ती मागे बसल्यावर तिचा हात अलगद माझ्या खांद्यावर ठेवून बसल्याची जाणीव करून द्यायची. मग आम्ही निघायचो..
‘के जैसे तुझको बनाया गया ही है मेरे लिये...’ असं काहीतरी ऐकू आले आणि मी पूर्व आयुष्यातील आठवणींमधून वर्तमानात आलो. थोडं स्वतःशीच हसलो...तेवढ्यात एक पंचविशीतील युवक समोर आला. 
येताना स्वतःशीच बोलत होता..what a rascal people…कोणालाच वेळेची काळजी नाही. वैगेरे वैगेरे...आमची नजरानजर झाली..अन मला उद्देशून म्हणाला, “excuse me, uncle..मी इथे बसू का ?” असं म्हणत बसला सुद्धा..

मला तो जरा कावराबावरा, थोडासा चिडलेला वाटला..ऐन पंचविशीचा, उंचपुरा, गोरापान..केस एकदम स्टाईलबाज, अंगात आत टी-शर्ट त्यावर सदरा, सदऱ्याचे दोन बटन उघडे आणि जीन्स... त्यासोबत कानात ते हल्लीच्या पोरांचं मंगळसूत्र(हेडफोन) असलेला तो मला अगतीकतेने म्हणाला, “ काका आता काय म्हणायचं याला..वेळ देऊन सुद्धा लोक वेळेवर येत नाही. वेळेची काही कदरच नाही..बरं  त्यांच्या नाही तर नाही पण माझं काय..?”
“चहा...चहा घेणार का?”  मध्येचं त्याचं बोलनं तोडत थोडा स्वर उंचावतच त्याला विचारलं.
“अं..” हे असं अनपेक्षित चहाचं विचारणं कसं काय झालं असा चेहरा करत त्याने “हो हो घेतो की.. दोन चहा दे रे” असं म्हणत चहाची ऑर्डर पण देउन टाकली.   
मग थोड शांत होत मोकळा बोलायला लागला.. “किती वेळ करते ही.. अजिबात वेळेच भान नाही.”
“घे, चहा घे..” असं म्हणून चहाचा कप त्याच्याकडे सरकवला..
“...आणि येईल रे. रस्त्यात कुठे अडकली असेल.”
माझे आश्वासनाचे चार शब्द ऐकून अजून शांत झाल्यागत बोलायला सुरुवात केली. “काका, माझी प्रेयसी..तशी फार प्रेमळ अन समजूतदार आहे हो..”
मी देखील त्याच्या सुरात सूर मिळवत “हं... तरी मला वाटलंच.. किती रे वैतागतो आहेस.. तू नाही करत का कधी उशीर..?”
“तसं मी हि उशीर करतोच म्हणा..” जरा शरमल्यागत त्याने उत्तर केलं.. “पण आता समजतंय, ती किती संयमी आहे ते..”
चहाचा फुरका मारत त्याला बोलत करायच्या हेतूने मी विचारले.. “मग काय भेटल्यावर नुसतं भांडतच राहतात कि काय तुम्ही..”
चहाचा घोट घेत तो बोलला,“छे हो काका, तसं नाही. मी चिडतो पण मग तीच फार प्रेमाने म्हणते,“ आता भांडतच रहायचं कि दुसरं काही बोलायचं पण..” मग माझा राग त्या वाक्याने विरघळून जातो अन मग आम्ही बोलतच राहतो. आता आज पण तिला उशीर झालाय..मग तिला डिवचून देतो आणि मग तिचा तो नाकाच्या शेंड्यावरचा लटका राग बघण्याचा योग कसा जुळवून आणतो बघा..”
 ह्या युगातलं प्रेम ऐकून नाजुकशी हास्याची किनार माझ्या चेहऱ्यावर आली आणि ह्या पठ्ठ्याने ती नजरेत पकडली सुद्धा.. “व्वा रे तुमच्या युगातलं प्रेम..” असं मी म्हटलं अन लगेच त्याने थोडंस घाबरून विचारलं.. “काका, एक विचारू?”
“अरे विचार की, तसं मलाही समजलंय तुला काय विचारायचं आहे..पण तरीही तूच विचार” थोडंस गंमतीने त्याला बोललो.
आश्चर्याने त्याने विचारले, “ सांगा मग मला काय विचारायचे आहे..?”
एव्हाना दोघांचे चहाचे कप रिते झाले होते.. त्याची उत्सुकता बघून मी अजून वन बाय टू चहा सांगितला.. “घे, चहा घे.. सांगतो तुला काय विचारायचे आहे..”
चहाचा कप हातात घेत.. “घेतो, पण तुम्ही सांगा.”
“अरे बाळा, तुला आमच्या युगातलं प्रेम जाणून घ्यायचं असणार दुसरं काय?” चहाचा घोट घेत त्याच्या नजरेत नजर मिळवत मी म्हणालो.
माझं वाक्य ऐकल्यावर आश्चर्याने डोळे मोठे करत म्हणाला, “ अरेच्या, तुम्हाला कसं समजलं?”
“हाहाहा.. अरे उगाच माझ्या डोक्यावरचे पांढरे झालेत का?”
“हं”..सांगा न काका तूमच्या काळातल्या प्रेमाबद्दल..
गंभीर होत मी सुरुवात केली.. “आमच्या काळात, आमच्या युगात प्रेम म्हणजे नक्की काय हेच समजत नव्हतं. आजकाल प्रेम आधी होतो मग टिकलं तर लग्न नाही तर थांबलं.. आमच्या वेळी न टेलिफोन, ना मोबाईल, मेसेज आणि व्हॉटसप तर फार लांबची गोष्ट.. आमचं विश्व फार छोटं असायचं..पण विश्वासामुळे इतकं पक्क असायचं की, पानिपतामधून स्वतः विश्वासराव जिवंत होतील..हाहाहा.  आजच्या मुलांना काय माहिती पानिपत आणि कोण विश्वासराव...तुला तरी माहितीये का कोण विश्वासराव आणि काय पानिपत?”
थोडा इगो दुखावल्यागत त्याने प्रत्युत्तर केलं.. “अर्थातच माहित असणार.. पेशवे कालीन ऐतिहासिक परंपरा असलेल्या पुण्याचा आहे मी..”
“अच्छा, म्हणजे तू पुण्याचा तर..” चहा घेत मी बोललो.
मोबाईल कडे बघत तो उत्तरला “हो.. इतक्या लांबून आलो हिला भेटायला तर हिचा पत्ताच नाही..”
“हो ना ते समजतंय कि, सारखा मोबाईल चालू बंद करतोय, तिला मेसेज करतोय..” अस म्हणत जुन्या युगातल्या प्रेमाबद्दल मी बोलायला लागलो.. “ बरं का.. आमच्या काळात भेट पाच वाजेला ठरली कि आम्ही पाच वाजायला पाच मिनिटे कमी असतानाच पोहचायचो..”
मध्येच बोलन तोडत तो म्हणाला, “आयला.. एवढं टाईम टू टाईम.”
“तेच तर सांगतोय मी, आमची दुनियाच फार छोटी असायची.. माझं विश्व ती आणि तीचं विश्व मी.” असं म्हणून यावर त्याची प्रतिक्रिया काय हे बघत होतो मी. 
“मग, तुमच्या वेळी संपर्क माध्यम काय?” फारच जिज्ञासु वृत्तीने त्याने प्रश्न केला.
मी पण बारीक हास्याने.. “तसं संपर्क माध्यम म्हणजे आमची आधीची भेट.. त्याच वेळी पुढची भेट कधी हे ठरवून टाकायचो.” 
“काका, अं... तुमच्या वेळी सुद्धा प्रेमाच कन्फर्मेशन I LOVE YOU म्हणूनच व्हायचं का..?” या प्रश्नाने जणू काही आमच्या संभाषणाला मुलाखतीचं रूप आल्याचं मला जाणवलं. हि मुलाखत म्हणजे एका युगाचं दुसऱ्या युगातील प्रेमाची तुलना असावी..
उत्तरादाखल मी बोललो,“अरे मित्रा, कसलं I LOVE YOU अन कसलं काय.. खरं प्रेम हे नजरेतूनच समजतं...पण ते प्रेम समजायलाही आपली नजर खरी आणि कोरी असायला हवी.” 
एवढं बोलतो न बोलतो तोच त्याचा फोन खणाणला...
“hallo, काय गं..? कुठे पोहोचलीस?..”
“बरं ठीक आहे.. थांब तिथेच मी पोहोचतोच..”
“कोण मी..? काही झालेलं नाहीये..पोहचतो मी आणि ऐक न.. LOVE YOU..!”
खिशात फोन ठेवत तो म्हणाला “काका, ती विचारत होती.. अचानक इतका शांत आणि प्रेमळ आवाज कसा?”  हाहाहा..
चहाचा शेवटचा घोट घेत घेत तो म्हणाला, “काका, actually मला निघायला हवं. फार छान वाटलं बोलून..पुन्हा केव्हा भेट होईल?”
काही खोटं उत्तर द्यायचा विचार करत होतो तेव्हा अचानक माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले’ “अरे बाळा, जा जा आधीच उशीर झालाय.. मी रोज पाच वाजता इथेच असतो.”
“अच्छा काका, निघतो मी..” असं म्हणत तो चार पावलं पुढे गेला नि मागे वळून खिशातून मोबाईल काढत माझ्याकडे आला..अन म्हणाला, “ काका, फोटो बघा न आमच्या जोडीचा..”
“अरे कशाला...”असं म्हणत असताना त्याने तो मोबाईल फोटो ओपन करून माझ्यासमोर पकडला सुद्धा...
“छान आहे हं जोडा. लक्ष्मीनारायणासारखा.. फारच सुरेख.. नशीबवान आहेस..” असं म्हणत मी फोन त्याच्याकडे दिला. 
“धन्यवाद काका, मी निघतो..” 

तो गेला.. मी मनामध्येच हसलो अन अजून एक चहाची ऑर्डर देऊन मनासोबतचं बोलायला सुरुवात केली.. फार नशीबवान आहे हा मुलगा.. खूप कमी लोकांना मिळतो असा दागिना.. मुलीचे डोळे फार आश्वासक होते..तिच्या गालावरची खळी तीचं नाजूक सौंदर्य खुलवत होती. आणि त्या खळीची नाजूक मोहोर तिच्या गव्हाळ वर्णावर उमटली होती. दोघांच्या नजरेतून त्यांच्या अतूट नात्यातलं प्रेम स्पष्ट दिसत होत..

माझी सौ.. अशीच गव्हाळ वर्णाची होती. तिच्याही गालावर मस्त खळी असायची. फारच सुंदर.. संसार फार सुरेख झाला आमचा. तसं आम्हाला संकटांची कमी नव्हती. एक झालं कि एक... पण आम्ही दोघांनी सगळे संकट लीलया पार केले; अन हसून जीवन जगलो. मी कधी निराश झालो तर ती म्हणायची,  “मी आहे ना..अन कराल तुम्ही..मला माहितीये..” बस्स.. आणि हे ऐकून मी देखील कुठल्याही संकटासमोर बारा हत्तींच बळ घेऊन उभं रहायचो.
माझ्या थोड्या रागीट स्वभावामुळे ती बऱ्याच वेळा नाराज व्हायची पण तिने कधी चार चौघात बोलून दाखवलं नाही कि नाराज झाली म्हणून कुठली जबाबदारी घेणं टाळणं असही केलं नाही.
असचं जीवन होतं आमचं..
तिला जाऊन आता तीन वर्षे झालीत. अगदी अचानकच सोडून गेली ती..अर्ध्यावरतीच डाव मोडला तिने... मी तर तेव्हा अगदी कावराबावरा झालो होतो. कारण माझं आयुष्य असलेली ती मला क्षणात सोडून गेलेली होती. ‘प्रेम’ या शब्दाचा अर्थ तिनेच तर समजवला आणि जगायला शिकवला होता..  पण जाताना मात्र संपूर्ण घराचा आधार म्हणून उभं राहण्याचा शब्द घेऊन गेली होती... म्हणून आज हि वडासारखा उभा आहे मी, ती नसलेल्या माझ्या कुटुंबात...तिच्याचसाठी..
पण पाच वाजेची वेळ मात्र फक्त तिच्याच साठी राखून ठेवलीये. रोज पाच वाजता गणपत बाबांच्या हॉटेल वर यायचं..चहा घ्यायचा..तिच्या आठवणींमध्ये मनसोक्त डुंबायचं.. हसायचं.. बस्स..
गेल्या तीन वर्षात बरचसं बदललं. गणपतबाबा गेले.. रेस्टॉरंटचं हॉटेल झालं. मात्र चहाची चव..पाच वाजेची रेडीओवरची गाणी आणि तिच्या आठवणी नाही बदलल्या.
एव्हाना चहाचा अडीचवा कप देखील संपला होता. बिल दिलं.. आणि आभाळाकडे नजर टाकली. मस्त तांबूस रंग घेऊन आभाळ नटलं होतं. सांज खुलली होती. वारा हि मस्त सुटला होता. झाडे झळझळ आवाज करत वाऱ्याला प्रतिसाद देत होती. गाडीकडे पोहचलो. गाडी काढली.. आज गाडी मोजून तिसऱ्या किक मध्ये सुरु झाली... पुढे निघणार तोच अलगद खांद्यावर काहीतरी जड झाल्यासारखं वाटलं... भास असेल.. छे भास कसला.. जणू काही तिनेच अलगद हात ठेवला असावा माझ्या डाव्या खांद्यावर.. म्हणून चमकून मागे थोडी मान तिरकी करून नजर पूर्ण फिरवून बघितले तर कोणीच नव्हते..क्षणाचाही विलंब न करता माझ्या नजरेने खांद्याचा वेध घेतला.. बघतो तर काय... झाडाचं एक पान गळून नेमकं त्याच खांद्यावर पडलं होत..
झाडाकडे बघितलं.. वारा सुटल्याने मस्त झळझळ करत होतं, आणि आज इतक्या वर्षानंतर मला डॉ.जगदीशचंद्र बोस यांचा सिद्धांत खरा जाणवला..
“वृक्षांनाही भावना असतात...!!”

वैभव सुरेश कातकाडे
katkade.vaibhav04@gmail.com
09595698759

पृथ्वी, मास्क, वजीर आणि बरंच काही...

Photo Credit : Priyanka Ghogare हा तुम्हाला ग्राफिक्स फोटो वाटतोय का ? वाटत असेल तर मग तुम्ही चुकलात, हा आहे आप...