विश्वस्त - एक
रहस्यभेद
इतिहास.. जो की घडुन गेला आहे.
पण हाच इतिहास असा देखील आहे की जो तुम्हाला उलगडवायला भाग पाडतो.
मग तो ठरवून उलगडावा लागतो अथवा अपघाताने..
उत्कंठावर्धक आणि रहस्यमय
कादंबरी लिहिण्यासाठी इतिहासकालीन घटनांचा पुरेपूर वापर केला जातो. इंग्रजीमध्ये
तर अश्या शेकडो कादंबऱ्या सापडतील. मराठी मध्ये सुद्धा या आशयाच्या कादंबऱ्या
आहेतच त्यापैकीच एक म्हणजे विश्वस्त... हि ऐतिहासिक कादंबरी नसली तरी इतिहास
उलगडण्यासाठी इतिहास, भूगोल, मिथके, अनुमाने आणि कल्पित यांवर आधारलेली आहे.
इतिहास खरंच घडला आहे कि नाही याच्या अगदी जवळ जाऊन वाचकाला निःस्तब्ध करून
ठेवणारी आहे. यामध्ये विश्वस्त ते वारसदार हा रहस्यमय प्रवास.. हा प्रवास होत
असताना नक्की वारसदार कोण आहे ? विश्वस्त कोण आहे ? त्यामध्ये राजकीय व्यक्तिमत्वाची पात्रता आहे का ? गिर्यारोहण
करणाऱ्या जेएफके टीम ला जे पाहिजे ते साध्य होत का ? कि
त्यांचे बलिदान असेच वाया जाते.. असंच काहीसं खिळवून ठेवणारं कथानक वसंत वसंत लिमये
लिखित विश्वस्त या कादंबरीमध्ये दडलंय.
रहस्यमय, थरारक आणि
वास्तवाच्या अगदी जवळ जाण्यासाठी खिळवून ठेवणारी ही विश्वस्त म्हणजे आपल्या
इतिहासाला खरं रूप देण्याचा प्रयत्न. आजच्या काळात फक्त म्हटलं
जातंय की, इतिहास हा वाचवला गेला पाहीजे, सांभाळला पाहिजे
पण प्रत्यक्षात 5 ते 10 % च प्रयत्न करत आहेत. कादंबरीमधील जेएफके टीम (जस्ट
फॉर किक) अशीच हॉटेल मध्ये रमणारी भटकंतीची आवड असणारी आणि काहीतरी नवीन करण्याची
जिद्द असलेली पाच जणांची टीम. ह्या टिमचा एकच ध्यास म्हणजे इतिहासकालीन घटना शोधणे, त्यांचा संदर्भ
लावण्यासाठी वाटेल ते करणे आणि तो संदर्भ तंतोतंत जुळविण्याचा प्रयत्न करणे. हे सगळं करत
असताना मात्र स्वतःच्या प्रोफेशनला हि धक्का न लागू देणं.
लेखकाने या कादंबरीमध्ये
२०१३-१४ या एक वर्षातील कालावधी घेतला आहे; परिणामी या एक वर्षाच्या काळात घडणाऱ्या सामाजिक
राजकीय घटनांचा उहापोह देखील वाचकाला एक वेगळीच अनुभूती देऊन जातो. यातील कालावधी
जरी ठराविक एक वर्षाचा असला तरी कादंबरीच्या पहिल्या प्रकरणामध्येच वाचक थेट
महाभारत कालीन श्रीकृष्णाच्या एका आगळ्यावेगळ्या रुपाकडे जाऊन पोहचतो. जो श्रीकृष्ण
आपल्या सर्वांपासून खूप दूर राहिला आहे.
कारण आपल्याला माखनचोर, गोपिकांचा प्रेमी आणि गीता सांगणारा असा श्रीकृष्ण
ठाऊक आहे. पण, कादंबरीमधील वृद्ध श्रीकृष्ण वाचताना नक्की जाणवते कि, इतिहासानेही असा
श्रीकृष्ण रंगवताना हात आखडता घेतला असावा. आणि याचमुळे कादंबरीचे वाचन सुरु
ठेवण्याची उत्कंठा वाढते.
दुर्गभांडार या नाशिकमधील
त्र्यंबकेश्वर येथील आणि सह्य पर्वत रांगेतील सुरुवातीचा दुर्ग. येथून दोन
पुराणकालीन ताम्रपट जेएफके टीम ला सापडतात. मात्र, त्यावर कोरलेली
ब्राम्ही लिपीतील संस्कृत श्लोक शोधताना हा प्रवास सुरु होतो. या टीम मधील जेऑन,
अनिरुद्ध, प्रसाद, मकरंद आणि शबीर असे सर्वच
एकापेक्षा एक. जेऑन परदेशातून खास ‘भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील इतिहास’ या
विषयात विद्यावाचस्पती हि पदवी मिळविण्यासाठी पुण्यात आलेली असते तर शबीर
पुण्यातीलच भारतीय चित्रपट संस्थेमध्ये असतो. बाकी मकरंद, अनिरुद्ध
आणि प्रसाद गिर्यारोहनामधील किडे असतात. कारण गिर्यारोहण आणि भटकंती हे त्यांच्या
जिव्हाळ्याचे विषय.
सापडलेले ताम्रपट आणि त्यांतील
असलेल्या श्लोकांचा लावण्यासाठी सुरु असलेली धावपळ यातून एक इतिहास उलगडण्याचा
प्रयत्न ते करत असतात. हे सारे नेटाने सुरु असतानाच अचानक बाका प्रसंग उभा राहतो
आणि त्याचा फायदा घेत त्यांची भेट एका राजकीय व्यक्तिमत्वाची होते. हि तीच राजकीय
व्यक्ती असते ज्या व्यक्तीला अखंड भारताची सत्ता पाहिजे आहे, आणि
त्यासाठी साम,दाम, दंड आणि भेद सर्व
राजकीय नीती वापरण्यास तो तयार असतो. अचानक झालेली हि एन्ट्री वाचकाला धक्का देऊन
जाते. लेखकाने या धक्कातंत्राचा फारच खुबीने वापर केलेला दिसून येतो. या धक्कातंत्राला
सिनेमी भाषेत इंटरकट म्हणतात; हा इंटरकट म्हणजेच
श्रीकृष्णाचं प्रकरण सुरु असताना अचानक वास्तवात येणं, तिथून
पुन्हा चाणक्य, महमूदचा गझनी यांना जाऊन भिडनं. स्थळ काल
यांचे विवरण अचानक बदलून पुन्हा वाचकाला वास्तवात घेऊन येणं आणि ते हि कादंबरीच्या
मुख्य गाभ्याला कोणताही धक्का न लावता. हे एकंदरीत कादंबरीचे आणि साहजिकच लेखकाचे
यश आहे.
द्वारावेस्तु संपत्ति: साधकाय सुपात्रिणे |
द्वारावेस्तु संपत्ति: साधकाय सुपात्रिणे |
लोककल्याणकार्यार्थ प्राप्यते निर्ममाय च ||१||
संपत्तीरेषा सोमाय शिवाच्छापविमोचनम |
लब्धं यत्र तू तत्रैव गुरुशन्योर्युताविह ||२||
प्राथम्ये भे च तत्पुर्वौ किर्तीक्यां कृष्णपक्षके |
तृतीयायां तिथौ रात्रौ काले सोमोदयात्मके ||३||
नाम्ना कीर्तीमुखात ज्ञानं गवाक्षात चन्द्ररष्मितु |
प्रकाशं याति संपत्तेरानुकुल्यपरीस्थितौ ||४||
अतीते बहुकालेSपि चानुकूले
प्रवर्तीते
यथारविन्दकन्दाच्च श्लोकार्थ: प्रकटीभवेत ||५||
सापडलेल्या श्लोकांचा शोध घेत
असताना त्यांना काही भव्य दिव्य भेटेल याची सुरुवातीला कल्पना सुद्धा नसते; या
पाच श्लोकांमध्ये द्वारकेच्या वैभवाचा उल्लेख आढळतो तसेच हे सारं वैभव एका
निर्मोही, सत्पात्री साधकाला देण्यात यावं आणि ते हि कसं
द्यावं याचा एक कोडेड मेसेज, स्पेसिफिक लोकेशन आणि स्पेसिफिक
वेळ दिलेली आहे. श्लोकांमधील सत्पात्र, निर्मोही आणि साधक हि
विशेषण तसेच इतर बाबी याचाच आधार घेत जेएफके अशा एका वळणावर पोहचते जेथून त्यांना
धड पुढेही जाता येत नाही मागे हि फिरता येत नाही. सोबतचे काही साथीदार त्यांना
सोडून जातात तर काही राजकीय, भांडवलदार व्यक्ती त्यांचा
फायदा करून घेण्यास तयार असतात. राजकीय व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी पक्षाचा किती
वापर करते याचाही सध्याच्या परिस्थितीशी सांगड घालत लेखकाने अनुरूप मांडणी केलेली
दिसते.
श्रीकृष्ण-उद्धव,
चाणक्य-चंद्रगुप्त, रामदास स्वामी-शिवाजी महाराज हा जो काही गुरु शिष्य, विश्वस्त
वारसदार यांचा प्रवास आहे तोच या विश्वस्त पुस्तकाने पुढे आलेला आहे. कादंबरीमध्ये
असलेल्या कालावधीत राजकीय परिस्थितीचा पुरेपूर वापर करून अतिशय रोमांच उभे करणारे
प्रसंग आहेत. यासाठी लेखकाने महाभारतकालीन द्वारका, पाटलीपुत्र, सोमनाथ मंदिर,
महमूद गझनी, स्कॉटलंड, टेक्सास आदी ठिकाणांचा जिवंत प्रसंग उभा केलेला आहे.
जेएफके टीमला त्यांच उद्दिष्ट
पूर्ण तर करायचं असत पण योग्य वारसदारापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी देखील
त्यांच्यावर असते. कादंबरी मध्यापर्यंत येते तोवर वाचकाला देखील समजत नाही कि
नक्की कोण या कादंबरीचा नायक आहे. अगदी शेवट शेवट सगळी कादंबरी वाचून संपायला येते
तेव्हा समजते आणि वेगवान घडामोडींनी कादंबरी पूर्णत्वाकडे पोहचते. कादंबरी वाचून
झाली तरी देखील अजून पुढे काय ? हा प्रश्न वाचकांना पडतो आणि हेच या कादंबरीचे
वैशिष्ठ्य होय. कादंबरीमधील विश्वस्त ते वारसदार हा जो प्रवास आहे त्यात प्राचीन
मध्ययुगीन अशा अनेक गोष्टींचे संदर्भ आहेत. त्यासोबतच सद्यपरिस्थितीतील अनेक
राजकीय, सामाजिक संदर्भही आढळतात. अज्ञात इतिहास, वर्तमान वास्तव, कल्पित आणि सत्य
यांमधील पुसट धूसर सीमारेषांवर खेळणारी आणि वेगवान घडामोडींच्या प्रवाहात वाचकाला
घेऊन जाणारी सोबतच खिळवून ठेवणारी अशी हि विश्वस्त पाचशे सव्वा पाचशे पानांची जरी
असली तरी दोन किंवा जास्तीत जास्त तीन बैठकीमध्ये संपवू शकतो.
या कादंबरीबद्दल अजून एक
वैशिष्ठ्य असे कि मराठी साहित्याचा विचार करता पहिल्यांदाच कुठल्या तरी मराठी
कादंबरीवर ट्रेलर/टीझर प्रकाशित झालेला असेल तर तो विश्वस्त या कादंबरीचा आहे.
ट्रेलर बघण्यासाठी क्लिक करा...
ट्रेलर बघण्यासाठी क्लिक करा...
जेएफके चा हेतू साध्य होणार का
? वारसदार झालेले विश्वस्तापर्यंत पोहचणार का ? विश्वस्त होण्यासाठी आतुर असलेला
तेवढी पात्रता म्हणजेच सत्पात्री निर्मोही साधक म्हणून कसोटीला उतरेल का ? कोण
कोणत्या राजकीय घटना यात येतात ? कोण कोणत्या दृश्य अदृश्य शक्ती यात सामील असतात
? आणि अखेरचा प्रश्न नक्की त्रिपुरारी
पौर्णिमेनंतरच्या तृतीयेचे महत्व काय ?
तर नक्की वाचा... विश्वस्त
वैभव सुरेश कातकाडे
(९५९५६९८७५९)
संहिता लेखक
विभागीय माहिती कार्यालय, नाशिक
No comments:
Post a Comment