विजय दिन
१६ डिसेंबर हा दिवस प्रत्येक भारतीय संरक्षण दलाच्या जवानाच्या तसेच बांग्लादेशच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. १९७१मध्ये याच दिवशी भारताने पाकिस्तानविरूद्धच्या युद्धात निर्णायक विजय मिळवला आणि बांग्लादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती केली.
पाकिस्तानच्या वतीने लेफ्टनंट जनरल ए.के. नियाझी यांनी ले. जनरल अर्जुन सिंह अरोरा यांच्या समोर शस्त्र (पिस्तूल) खाली ठेवून शरणगतिपत्रावर सही केली. या शरणागतीमध्ये पाकिस्तानचे ९३०००सैनिक सामिल होते.
भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लगेचच संसद भवनात बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व जगाच्या नकाशावर बांगलादेश हा नवीन देश उदयास आला. १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी या राष्ट्राचा समावेश संयुक्त राष्ट्रामध्ये करुन घेतला.
या युद्धाला तशी सुरुवात २५ मार्च १९७१ मध्येच झाली होती. पश्चिम पाक ने ऑपरेशन सर्चलाइट सुरु करुन पूर्व पकिस्तान मधील आंदोलनकर्त्यांचे अनन्वित अत्याचार सुरु केले होते. यातूनच आंदोलनकर्त्यांनी बांग्लादेश मुक्ति वाहिनी नावाने संघटना उभारून पाक सैन्याविरुद्ध तोंड देण्यास सुरुवात केली. भारताने बांग्लादेश मुक्ति वाहिनीला मदत पुरविली.
याच वर्षी डिसेंबर मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कलकत्ता येथे सभा सुरु असताना पाक सैन्याने भारतीय हवाई तळांवर हल्ले सुरु केले. पंतप्रधान गांधी तातडीने दिल्लीच्या दिशेने निघाल्या पण दिल्ली मध्ये ब्लॅकआउट असल्या कारणाने त्या दिल्ली मध्ये पोहचु शकल्या नाही. लखनऊ येथून त्यांनी सर्व सूत्र हलविन्यास सुरुवात केली. आणि अखेर 3 डिसेंबर रोजी भारतपाक युद्धाचा नगारा वाजला. पाकिस्तानने यात भारतीय ११हवाई तळांवर हल्ले केले. भारताने पूर्वीकडे बांग्लादेश मुक्ती वाहिनीला मदत तर पश्चिमेकडे आर्मीद्वारे आक्रमण असा पवित्रा घेतला. त्यामुळे सलग १३ दिवसरात्र चाललेल्या युद्धात पाकिस्तान सैन्याला हार पत्कारावी लागली.
ही हार पाकिस्तानला चटका लावून गेली आणि भारत या आमच्या शेजारील राष्ट्राने आमच्या देशाचे दोन तुकडे केले अशी पाकिस्तानी जनमानसात अजूनही भावना आहे.
पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रप्रमुख याह्याखान यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. कालांतराने बांगलादेशचे निर्माता शेख मुजिबूर रहमान यांची मुक्तता करण्यात आली. १० जानेवारी १९७२ रोजी मुजिबूर रहमान परत बांगलादेशात आले.
या युद्धात भारताचे जवळपास ४ हजार सैनिक कामी आले. भारताने पाकिस्तानचे ९० हजाराहून अधिक सैनिक व समर्थक युद्धबंदी बनवले. या युद्धात आजवरच्या इतिहासात उपखंडातील सर्वात जास्त प्रमाणात झालेले मानवी शिरकाण मानवतेला काळीमा फासनारे असे होते. यात मुख्यत्वे बांगलादेशातील हिंदूंना मारण्यात आले.
३ डिसेंबरला सुरू झालेले भारत-पाकिस्तानमधील हे तिसरे युद्ध १६ डिसेंबरला संपले खरे पण या दोन देशांमधील वैमनस्य मात्र आजही संपलेले नाही.
कारगीलची घुसखोरी व वारंवार होणाऱ्या घातपाताच्या घटना पाहता हे वैर इतक्यात संपण्याची शक्यताही नाही.
१९७१च्या युद्धाचा ४६वा विजय दिन साजरा करताना सीमांवर सदैव दक्ष राहणाऱ्या भारतीय जवानांना मानाचा सलाम !
जय हिंद..।
No comments:
Post a Comment