जनसंपर्क अधिकारी...व्याख्या, भूमिका
संस्था कोणतीही जनतेशी तिची नाळ येनकेन प्रकारे जोडलेली असतेच. संस्थेचे कार्य जनतेपर्यंत पोहचवायचे झाल्यास जनता आणि संस्था यांमधील एक दुवा म्हणून संस्थेला कोणी एक सेवक हवा असतो. हाच सेवक म्हणजे त्या संस्थेचा जनसंपर्क अधिकारी होय.
जनसंपर्क अधिकारी हा संस्थेच्या गळ्यातील ताईत समजला जातो. संस्थेला समाजासोबत जोडणाऱ्या किल्ल्या म्हणजे जनसंपर्क अधिकारी असतो. त्यामुळे संस्थेची प्रतिमा जगासमोर कशी ठेवायची हे बघण्याचे सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावर असते.
जनसंपर्क हे जाणीवपूर्वक नियोजनबद्ध आणि प्रयत्नपूर्वकरित्या संस्था आणि लोकांमध्ये परस्पर सामंजस्य निर्मिती आणि व्यवस्था करणारे तंत्र म्हणजे जनसंपर्क होय.
शासनाची जनसंपर्क हि वेगळी शाखा आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय या नावाने या विभागाचा कामकाज चालते. ज्याद्वारे शासनाचे रोजचे काम जनतेपर्यंत पोहचवता येते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या विभागाचे एक कार्यालय आहे. महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र म्हणून लोकराज्य हे मासिक ओळखले जाते. महाराष्ट्र शासनाच्या प्रसिध्दीच्या कामाचे संपूर्ण समन्वयन करणारी यंत्रणा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची ओळख सर्वांना आहे. शासन आणि जनता यांना जोडणारा तो एक महत्वाचा दुवा आहे. शासनाचे उपक्रम जनतेपर्यंत आणि जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहचविण्याची दुहेरी जबाबदारी महासंचालनालयास पार पाडावी लागते. महाराष्ट्र शासनाचे विविध कल्याणकारी निर्णय, उपक्रम, धोरणे, विविध मोहिमा आणि विविध योजनांची माहिती या यंत्रणेद्वारे जनतेपर्यंत पोहचविण्यात येते. दैनंदिन वृत्तविशेष प्रसारित करणे, माहितीपूर्ण रंगीत प्रसिध्दी साहित्याची निर्मिती करुन अशा प्रसिध्दी साहित्याचे वाटप करणे, विविध विषयांवर वृत्तचित्र (अनुबोधपट) निर्माण करणे, असे वृत्तचित्र (अनुबोधपट) नागरी तसेच ग्रामीण भागातून जनतेस नित्यनेमाने दाखविणे, राज्य विभागीय व जिल्हा स्तरांवर प्रदर्शने आयोजित करणे तसेच राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये भाग घेणे, विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयांमार्फत शासनासंबंधीची माहिती पुरविणे, शासकीय जाहिरातीचे विविध वृत्तपत्रांना वाटप करणे हया गोष्टींचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कार्यात समावेश होतो. जनतेची मते व प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी राज्यात प्रसिध्द होणाऱया सर्व महत्वाच्या वृत्तपत्रांची व अन्य प्रकाशनांची रोजच्या रोज हया विभागामार्फत छाननी केली जाते आणि त्याद्वारे प्रगट झालेली जनतेची शासकीय ध्येयधारणे व कार्यक्रम हयासंबंधीची सर्वसाधारण प्रतिक्रिया व तिचे एकूण स्वरुप हयासंबंधीची माहिती शासनाला सतत पुरविण्यात येते. तसेच नित्यांच्या कामापेक्षा वेळोवेळी अनेकविध उपक्रम शासनाच्या विविध खात्यांच्या सुचनेनुसार या महासंचालनालयाला हाती घ्यावे लागतात.
महासंचालक या पदावरील सनदी अधिकारी या यंत्रणेचा प्रमुख असतो. महासंचालकांच्या अखत्यारीत संचालक (माहिती), संचालक (प्रशासन)/ मुंबई येथे व औरंगाबाद, नागपूर येथेही संचालकांची पदे आहेत. विभागीय स्तरावर सात उपसंचालकांची पदे आहेत. (कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नवी दिल्ली) आणि जिल्हा माहिती कार्यालये (35) कार्यरत आहेत. तसेच महाराष्ट्रातील योजनांची माहिती महाराष्ट्राबाहेरील जनतेला देण्यासाठी दिल्ली आणि गोवा येथेही महाराष्ट्र परिचय केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत.
खासगी क्षेत्रामध्ये जनसंपर्क प्रमुख हा कम्युनिकेशन व्यवस्थापक म्हणून ओळखला जातो. त्याच्याकडे जनसंपर्क या सोबतच व्यवसाय कसा वाढेल याच्याही जबाबदाऱ्या असतात. उदाहरण द्यावयाचे झाल्यास आपण एका सहकारी बँकेचे उदाहरण घेऊ शकतो.
बँकेचा कम्युनिकेशन व्यवस्थापक आपली बँक कशी सर्वांपेक्षा वेगळी आहे त्याचप्रमाणे तिचे कार्य जनतेपर्यंत कसे पोहचवायचे याचे नियोजन आखतो. मनपा तर्फे होर्डिंग लावून, वृत्तपत्र, रेडीओ, सोशल मिडिया आदी ठिकाणांहून तो जाहिराती स्वरुपात समाजात आपल्या बँकेविषयी एक प्रतिमा तयार करतो. पुढे जाऊन त्याचे महत्वाचे काम असते कि बँकेमध्ये खातेदार वाढविणे.. यासाठी तो विविध कंपन्यांमध्ये संपर्क करून तिथल्या कामगार वर्गाला आपल्या बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी आवाहन करतो हे आवाहन करत असताना त्यांच्यासाठी काही विशेष सवलती, योजना देतो यामुळे आपसूकच बँकेमध्ये येणाऱ्या खातेदारांची संख्या वाढेल. दुसऱ्या प्रकारे म्हणजे तो विविध सामाजिक संस्थाच्या कार्यक्रमांना प्रायोजकत्व देऊन तेथील लोकांना आकर्षित करतो.
जनसंपर्क हे संशोधन, कृती, संवाद, आणि मूल्यमापन या चार घटकांवर अवलंबून असते. एखाद्या विषया संबंधीच्या हेतूचे संशोधन या गृहीतकृत्याची आखणी होऊ शकते आणि संवादाच्या माध्यमातून संवादाच्या माध्यमातून संस्था व लोकांपर्यंत समजून देणे आणि त्यांनी ते स्वीकारणे या विषयाचे लोकांवर झालेल्या परिणामाचे मूल्यमापन करता येते.
नव्वदच्या दशकापासून लोकप्रतिनिधी देखील सोबत एक जनसंपर्क अधिकारी ठेवायला लागले. हेच जनसंपर्क अधिकारी नंतर स्वीय सचिव, खासगी सचिव म्हणून ओळखले जातात. लोकप्रतिनिधींच्या विश्वासातील माणूस हे पद भूषवतो. त्यामुळे मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या राजकारणातील पडद्यामागच्या वजिराची भूमिका जनसंपर्क अधिकारीच वठवतो.
वैभव सुरेश कातकाडे
katkade.vaibhav04@gmail.com
09595698759
धन्यवाद
ReplyDeleteछान माहिती....
ReplyDeleteRelationship Manager असतात ना बर्याच संस्थांमधे असतात.
अप्रतिम ब्लॉग सर आम्हाला हा विषय आहे पण एवढा कळलं नाही जेवढा तुमचा ब्लॉग वाचून कळलं 😍
ReplyDelete