Wednesday, August 3, 2016

ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दत्तू भोकनळ यांसोबत केलेली ही बातचीत...

आईसाठी मेडल आणायचे आहे- दत्तू भोकनळ
ब्राझीलमधील रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही गावातील दत्तू भोकनळ हे नौकानयन मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 6 ऑगस्ट रोजी या स्पर्धेत सहभागी होऊन नौकानयन स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणारे ते पहिले महाराष्ट्रीय ठरतील. नुकतेच त्यांनी अमेरिकेमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासोबत केलेली ही बातचीत...
प्रश्न :- देशाचे स्वाभाविकच महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करता आहात; काय वाटते आहे?
उत्तर :- खूप छान वाटतंय. हा खेळ शारीरिकदृष्ट्या फार अवघड आहे. तरी देखील सर्व कसोट्या पार करत इथपर्यंत पोहचलो आहे. आता अंतिम लक्ष्य गाठायचंच आहे.

प्रश्न :- आपल्या मायभूमीबद्दल काय भावना आहेत?
उत्तर :- नाशिक मधील खेडेगावात जन्म झाला. संघर्ष काय असतो आणि खडतर परिस्थितीत आपल्या ध्येयावर लक्ष्य कसे केंद्रीत ठेवायचे हे नाशिकने शिकवले. पुढे पुण्यामध्ये नाशिक फाटा परिसरात सराव करत असल्याने पुण्याचेही बरेच योगदान आहे. राज्य सरकारनेदेखील अर्थसहाय्य केले.

प्रश्न :- पारंपरिक खेळाकडे वळण्याऐवजी या खर्चिक क्रीडा प्रकाराकडे कसे वळलात ?

उत्तर :- सन 2012 मध्ये सैन्यदलात मी वाहनचालक म्हणून रुजू झालो. तोपर्यंत या खेळाबद्दल काहीच माहिती नव्हती. सुभेदार कुदरत यांनी माझी शरीरयष्टी बघून या खेळाची गोडी लावली आणि मार्गदर्शन केले. नौकानयनमध्ये आवड निर्माण झाली; स्पर्धा जिंकू लागलो. हे सर्व कसे आणि किती वेगाने घडले ते मलादेखील कळले नाही.

प्रश्न :- चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही ते रिओ... काय सांगाल या प्रवासाबद्दल...
उत्तर :- संघर्षमय प्रवास... घरी परिस्थिती हालाखीचीच होती. इयत्ता पहिली ते नववी चे शिक्षण कष्टाचे झाले. वडील विहिरीचे काम करायचे. इयत्ता नववीला असताना वडील आजारी पडले. त्यांच्या औषधोपचारासाठी विहिरीचे सर्व साहित्य विकले. मजुरी करुन घर चालवले. अशातच 2011 मध्ये वडील वारले. घरातील प्रमुख आधार हरपल्यानंतर गावातील मंडळींकडूनही फारसे सहकार्य मिळायचे नाही. फार वाईट वाटायचे. या काळात काका आणि मामा यांनी मला आधार दिला. प्रतिकुलताच आपल्याला घडविते. त्याचवेळी ठरवलं ग्रामस्थांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल अशी मोठी कामगिरी करायची. 

सैन्यदलात आल्यानंतर सारंच बदलत गेलं. सुभेदार कुदरत अली यांनी खूप मार्गदर्शन केलं. 2014 साली पुण्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्णपदक मिळविले. पुढे पात्रता फेरीत दोन किमी अंतर सात मिनिटे 14 सेकंदात पार करुन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलो; नुकत्याच झालेल्या अमेरिका राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. 

प्रश्न :- द.कोरिया ऑलिम्पिक पात्रता फेरीत दोन किमी अंतर सात मिनिटे 14 सेकंदात पार करण्याची छान कामगिरी केलीत. हे कसे जमले?
उत्तर :- 2015 च्या आशियन स्पर्धेत पाठीचे दुखणे असतानाही खेळलो होतो. त्याचवेळी रिओ ऑलिम्पिक मध्ये खेळायचं हे लक्ष्य ठरवलं होतं आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टींचे नियोजन केलेलं होतं. मेहनतही घेतली.

प्रश्न :- आताच आपण सांगितले की, सगळं नियोजनानुसार चालू आहे. गेल्या वर्षभरात कसं होतं नियोजन?
उत्तर :- राष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक इंदरपाल सिंग यांनी एक वेळ ठरवून दिली होती. त्याच वेळेसाठी झटत होतो. शरीरात फॅटस् अजिबात नाही ठेवले. जेवढी ताकद वाढवता येईल तेवढी वाढवत होतो. एवढ्या वेळेत एवढं अंतर पार करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर होतं त्यामुळे तेवढी वेळ नोंदवता आली. 

प्रश्न :- मधल्या काळात म्हणजेच पात्रता फेरीनंतरचे नियोजन कसे होते?
उत्तर :- पात्रता फेरीला निघण्यापूर्वी आईला अपघात झाला. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली आणि कोमात गेली. पुण्याच्या आर्मी हॉस्पिटल मध्ये मित्रांच्या देखरेखीखाली तिला अॅडमिट केले आणि कोरियाला रवाना झालो. तिथे जिंकून आल्यानंतर आईची स्मरणशक्ती गेल्याचे समजले; पण ध्येयापासून मागे यायचे नव्हते. सराव चालूच ठेवला. कोच इस्माईल बेग आणि राजपाल सिंग यांनी या काळात मार्गदर्शन केले. एक महिना भारतात राहिल्यानंतर पुढील दोन महिन्यांसाठी म्हणजेच सध्या अमेरिकेत सराव करतो आहे. या पुढचा सराव अजून कठीण असेल. पुढे ब्राझील मध्ये गुरुवारी पोहोचल्यानंतर 5 तारखेपर्यंत सराव करणार आणि स्पर्धा 6 तारखेला आहे.

प्रश्न :- मोठ्या स्पर्धांसाठी शारीरिक तंदुरुस्ती सोबतच सकस आहाराची आवश्यकता असते. आपण कसा आहार ठेवला?
उत्तर :- आहाराच्या बाबतीत मी वेळापत्रकच बनविले आहे. सकाळी अर्धा लिटर पाणी, दोन ब्रेड, जाम नंतर सराव. सरावानंतर चार ब्रेड, जाम, अर्धा लिटर दूध, दोन अंडी. दुपारी शांत झोप. रात्री जेवणात भात, भाजी आणि थोड्या प्रमाणात मांसाहार असा असतो. तर सरावादरम्यान ‘एनर्जी ड्रिंक’ घेत असतो. 

प्रश्न :- 2012 मध्ये ज्या खेळाबद्दल किंचितही माहिती नव्हती, त्या खेळाट प्राविण्य मिळवत ऑलिम्पिक वारी निश्चित केली.... काय सांगाल याबद्दल?
उत्तर :- याचे सर्व श्रेय मी मला प्रत्येक टप्प्यावर लाभलेल्या मार्गदर्शकांनाच देईल. त्यांनी वेळोवेळी मला प्रोत्साहित करुन या खेळासाठी तयार केले. मी निश्चित प्रयत्न केले पण त्यासाठी व्यवस्थित दिशा त्यांनीच मला दिली. 

प्रश्न :- रिओ ला जात आहात त्याबद्दल सैन्य दलातील अधिकारी आणि समाज यांच्या काय भावना आहेत?
उत्तर :- रिओ साठी निवड झाल्यापासून सगळं बदललं आहे. आधी सहसा दुर्लक्ष केलं जायचं, पण आता सगळे स्वत:हून लक्ष देत आहेत. सैन्यदलातील अधिकारी वर्ग नेहमीच प्रोत्साहन देत आलेला आहे आणि आता सुद्धा माझ्याकडून सर्वांना खूप अपेक्षा आहे.

प्रश्न :- आपण ऑलिम्पिकला जाणारे पहिले महाराष्ट्रीय नौकानयनपटू आहात ? उदयोन्मुख खेळाडूंना काय संदेश द्याल? 
उत्तर :- प्रशिक्षकांना खेळाडूंकडून खूप अपेक्षा असतात. खेळाडू सर्व प्रयत्न करतात, पण अंतिम क्षणाला आशा सोडून देतात आणि अपयशी होतात. खेळाडूंनी तसे न होऊ देता शेवटपर्यंत टिकून रहायला हवे. नकारात्मक विचारांना कुठेही थारा द्यायला नको. एक नकारात्मक विचार सारं काही उध्वस्त करतो. 

प्रश्न :- आम्ही सारे नाशिककर कल्पना करतो आहे की आपल्या जिल्ह्यातील खेळाडू तिरंगा घेऊन सामन्याला उतरत आहे... आपण काय कल्पना करुन ठेवली आहे या क्षणाबद्दल...
उत्तर :- फार अभिमानाची वेळ असेल ती. जेव्हा पाण्यात उतरण्यासाठी बोट काढेल तेव्हा तिरंग्याकडे बघून आपोआपच आत्मविश्वास जागृत होईल.. आणि तो तिरंगा तुलनेने सर्वात उंच कसा जाईल याचसाठी प्रयत्न करेन... आणि यश मिळवेन.. मला दुसरे काहीच माहिती नाही. माझ्या आईला मेडल आणून द्यायचे आहे....

प्रश्न :- आपल्याला जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शुभेच्छा...
उत्तर :- धन्यवाद. 

शब्दांकन- वैभव कातकाडे

No comments:

Post a Comment

पृथ्वी, मास्क, वजीर आणि बरंच काही...

Photo Credit : Priyanka Ghogare हा तुम्हाला ग्राफिक्स फोटो वाटतोय का ? वाटत असेल तर मग तुम्ही चुकलात, हा आहे आप...